Home प्रशासन नगरपालिका प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या समस्यांचे निराकरण करावे – उमेश फेगडे

प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या समस्यांचे निराकरण करावे – उमेश फेगडे


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात नगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून अस्वच्छतेचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक उमेश फेगडे यांनी केली आहे.

यावल शहराची लोकसंख्या सध्या जवळपास ६० हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत नागरी सुविधांचे नियोजन होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः ऐन उन्हाळ्यात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शहरातील विविध भागांमध्ये जलवाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून घरगुती कामांवरही त्याचा परिणाम होत आहे.

यासोबतच शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नानेही गंभीर स्वरूप धारण केले आहे. शहरातील अनेक भागांत नियमित साफसफाई होत नसल्याने गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहेत. सफाई कर्मचारी दोन-दोन दिवस स्वच्छतेच्या कामासाठी येत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. गटारीतील कचरा आणि साचलेली घाण काढल्यानंतर ती उचलण्यासाठीही तीन ते चार दिवस विलंब होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

नगरसेवक उमेश फेगडे यांनी नगरपालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, शहरातील नागरिक सातत्याने समस्यांचा सामना करत आहेत, मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. “हॅलो नगराध्यक्ष” ही हेल्पलाईन देखील निष्क्रिय ठरत असून नागरिकांच्या तक्रारींवर योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि अस्वच्छतेच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपालिकेने तातडीने प्रभावी नियोजन करून नियमित पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound