सावधान दुकानमालकांनो! जळगावात बालकामगारप्रकरणी दोघांवर गुन्हा; आता तुमची पाळी?


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे शोषण केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (१९ जून) फुले मार्केट परिसरातून सहा बालकामगारांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी दोन दुकानमालकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या वेगवेगळ्या भागांत बालकामगारांकडून कमी वेतनात काम करून घेतले जात असल्याची गोपनीय माहिती सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, शहर पोलीस ठाणे आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे शहरातील आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली.

या तपासणीदरम्यान, फुले मार्केट परिसरातील ‘सागर सुटकेस सेंटर’ या दुकानात चार बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले. तसेच, याच परिसरातील ‘ओम ट्रेडिंग’ या किराणा दुकानातही दोन बालकामगार आढळून आले. पथकाने तात्काळ कारवाई करत या दोन्ही दुकानांतून एकूण सहा बालकामगारांची सुटका केली.

या प्रकरणी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने जितेंद्र सुभाष पवार (वय ३८, रा. खोटे नगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर सुटकेस सेंटरचा मालक अनिल नाणूमल मेघवाणी (वय ५३, रा. गणपती नगर) आणि ओम ट्रेडिंगचा मालक राजेंद्र निंबा शिनकर (वय ५१, रा. आदर्श नगर) या दोघांविरोधात बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील करत आहेत. ही कारवाई बालकामगार प्रथेला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.