पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील कुरंगी, माहिजीतील १०० ते १५० विद्यार्थी आपले भविष्य घडविण्यासाठी म्हसावद येथील शाळेत जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून बस फेरी अचानक बंद झाल्या असून त्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशा मागणीचे निवेदन आज विद्यार्थ्यासह माहिजी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने पाचोरा आगाराच्या व्यवस्थापक निलिमा बागुल यांना देण्यात आले.
निवेदन देते प्रसंगी आरिफ शेख रफीक, अनिस शेख सिकंदर, नाजिम शेख नुरोद्दिन, शेख जव्वाद शेख अझरोद्दिन, आबिद हुसेन पिंजारी, आरिफ शेख सलीम हे विद्यार्थांचे पालक उपस्थित होते.
तालुक्यातील माहिजी, कुरंगी सह परिसरातील गावातील सुमारे १०० ते १५० विद्यार्थी हे उर्दु माध्यमिक शाळेत उर्दु माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी इकरा उर्दु हायस्कुल, बोरणार या शाळेत दाखल झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते.
मात्र सद्यस्थितीत कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने कोरोनाचे नियम पाळुन दि. १५ जुन २०२२ सर्वत्र शाळा सुरू केल्या आहेत. दरम्यान तालुक्यातील कुरंगी, माहिजीसह परिसरातील गावातील विद्यार्थ्यांना एस. टी. महामंडळाची बसच एकमेव पर्याय असुन या मार्गावरील बस सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे पालक हे शेती अथवा हातमजुरी करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत असल्याने ते विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यास जावु शकत नाही. तसेच या मार्गावर खाजगी वाहतुक देखील अत्यल्प स्वरुपात असुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. बंद करण्यात आलेल्या बसेस पुर्ववत सुरू करण्यात याव्यात या रास्त मागणीसाठी पाचोरा आगाराच्या व्यवस्थापक निलिमा बागुल यांना सदरचे निवेदन देण्यात आले.
पंढरपूर यात्रेसाठी जादा बसेस सोडण्यात आल्याने बसेसची कमतरता – आगार व्यवस्थापक निलिमा बागुल
येत्या दि. १० जुलै रोजी देवयानी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरला जात असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे यात्रोत्सव साजरा न होवु शकल्याने यावर्षी मोठा उत्साह पंढरपूर येथे असुन भाविकांकडुन बसेसची मागणी वाढली आहे. माहिजी, कुरंगी मार्गावर लवकरच बस सेवा पूर्ववत केली जाईल अशी माहिती आगार व्यवस्थापक निलिमा बागुल यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.