‘नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी’ – मागणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

पाचोरा – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन – २०२१ अंतर्गत पाचोरा व भडगाव तालुक्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम तात्काळ जमा करावी. याकरिता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन – २०२१ अंतर्गत पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रमुख पिके असलेल्या (कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, इ.) पिकांचे खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या खंडा (ग्रॅप) मुळे तसेच नंतर झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे बाबत व प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत होणेबाबत त्यावेळी देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागणी केली गेली होती. या अनुषंगाने संबंधित विमा कंपनी (आय. सी. आय. सी. आय लॉम्बर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.) (भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी ही आता आय. सी. आय. सी. आय. लॉम्बर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. चा भाग आहे) यांनी तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. अशी मागणी त्यावेळी केली होती. असे अमोल शिंदे यांनी सांगितले.

सदरच्या मागणी व सततच्या पाठपुराव्यानुसार नुकसानीचे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना व प्रतिकूल हवामान परिस्थिती (मिड सिझन अॅडव्हर्टसिटी) मध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यातील पात्र एकूण ७७१ शेतकऱ्यांना ८५ लाख २८ हजार  २९८ रुपये व वैयक्तिक नुकसान व सॅम्पल सर्वेनुसार झालेल्या नुकसानी करिता पाचोरा व भडगाव तालुक्यातील ४ हजार ४६० शेतकऱ्यांना १ कोटी ७८ लाख ५० हजार ४२८ रुपये आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. परंतु उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम म्हणजेच सॅम्पल उत्पन्नावर  निश्चित झालेले नुकसान भरपाई (येल्ड बेस्ड लॉसेस)ची रक्कम आजतागायत विमा कंपनीने शेतकऱ्यांना अदा केलेली नसल्याचे माहिती प्राप्त झालेली आहे.

तसेच सदरील नुकसानीची रक्कम निश्‍चित करण्याकरता आवश्यक असलेले पिक कापणी प्रयोगाचे संकलन (क्रॉपकटींग एक्स्पेरिमेंट) देखील जळगाव जिल्ह्यात पूर्ण झाले असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले. तरी तात्काळ संबंधित विमा कंपनीस शेतकऱ्याची नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम अदा करणेबाबत आदेशित करावे. तसेच तात्काळ या विषयात लक्ष घालून संबंधित विमा कंपनीस आदेशित करावे.” असे निवेदनाद्वारे मांडण्यात आले.

या निवेदनाची प्रत प्रांताधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनादेखील देण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, सरचिटणीस गोविंद शेलार, दिपक माने, सुनील पाटील, समाधान मूळे, बाळकृष्ण धुमाळ, जगदीश तेली, जगदीश पाटील, विरेंद्र चौधरी सह पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content