राष्ट्रीय केळी संशोधन संस्थेच्या वतीने या’ दोघांना पुरस्कार जाहिर

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तामिळनाडू राज्यातील त्रिची येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय केळी संशोधन संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर दिला जाणारा ‘सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान प्रसार – प्रिंट मीडिया’ हा पुरस्कार सकाळचे रावेर बातमीदार दिलीप वैद्य यांना तर उत्कृष्ट शेतकरी म्हणून रावेर तालुक्यातील निर्यातक्षम केळीचे उत्पादक विशाल अग्रवाल यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.  तामिळनाडूतील त्रिची येथील एका कार्यक्रमात या दोघांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन संस्थेचे संचालक डॉ आर सेल्वराजन यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

संस्थेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ‘केळी उत्पादन आणि विपणनातील कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील परिसंवाद ही यावेळी आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान आणि उद्योजकता व व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ व्ही पलनि मुथू, कृषी अभियांत्रिकी विभागाचे माजी उपमहासंचालक डॉ के अलगू सुंदरम, कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक डॉ व्ही वेंकट सुब्रमण्यम यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री वैद्य हे गेल्या ३२ वर्षापासून दै सकाळ आणि ॲग्रोवनसाठी तालुका बातमीदार म्हणून काम पाहत आहेत. या काळात त्यांनी केळी या विषयावरील विविध यशोगाथा, केळीच्या विविध समस्या, त्यावरील उपाय, केळी लागवड उत्पादनातील तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग,केळी वाहतूक या विषयावर सातत्याने लेखन केले आहे. २०१८ मध्ये त्यांनी इस्राईल येथील ‘ॲग्रीटेक – २०१८’ या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन वृत्तांकन केले होते. २००५ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या जागतिक केळी परिषदेतूनही सकाळ- ॲग्रोवनसाठी त्यांनी वृत्तांकन केले होते. २००९ मध्ये रेल्वे वॅगन्स द्वारे केळी वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्ली येथे गेलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात त्यांचा सहभाग होता. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत केळीचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले होते.केळी पीक विमा, शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई, त्यातील अडचणी, केळीची निर्यात वाढण्यासाठीचे प्रयत्न, त्या समोरील आव्हाने याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

श्री अग्रवाल हे इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले युवा केळी उत्पादक शेतकरी असून ते आपल्या अटवाडे ता रावेर येथील शेतीत विविध प्रयोग करतात. सध्या केळी निर्यातीवर त्यांचा भर असून त्यांच्यासह परिसरातील अन्य युवा शेतकऱ्यांना सोबत घेत अधिकाधिक निर्यातक्षम केळी उत्पादन आणि निर्यात करण्यावर त्यांचा भर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत बाजारपेठेचा अभ्यास करून अधिकाधिक केळी निर्यात करण्यावर त्यांचा भर आहे. २०१७ मध्ये त्यांनी भारतीय मानक ब्युरो परिषदेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले. २०१८ मध्ये इस्राईल येथे अभ्यास दौरा केला, याच वर्षी जळगाव येथील जागतिक केळी परिषदेत सक्रिय सहभाग घेतला. स्वतः केळीचे पॅक हाऊस उभारले, मॅक्स फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली व फिलिपाईन्सचा अभ्यास दौरा करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त केळी कशी निर्यात होईल याबाबत खासगी कंपन्यांची चर्चा केली.

 

Protected Content