बेंडाळे महिला महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संवाद मेळावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत डॉ. अण्णासाहेब जी.डी. महाविद्यालयात विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आपल्या करिअरचे कशा पद्धतीने नियोजन करावे या संदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टीं विषयी माहिती दिली. प्रामुख्याने सुखी आणि समृद्धी आयुष्य घडविण्यासाठी करिअरचा  ई.एम.आय.नेमका काय हे सांगितले. आणि कशा पद्धतीने भरावा आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व दिले जाते हे अनेक उदाहरण देऊन सांगितले.

त्यानंतर करिअर कट्ट्याचे विभागीय समन्वयक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मार्गदर्शन करीत असताना सांगितले की, यशस्वी होण्यासाठी अत्यंत कठोर मेहनत आणि परिश्रम केल्याशिवाय यश मिळणार नाही आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. कारण यश प्राप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असा आनंद हा आपल्याला मिळतो आणि त्यामुळे आपल्या सर्व कुटुंबियांचं समाजातील स्थान उंचावते. त्यासाठी आर्थिक परिस्थितीचे भांडवल नकरता परिश्रम करून यश संपादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अडचणी वर मात करा असे आवाहन केले. तसेच जळगांव जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. स.ना.भारंबे एम. जे. कॉलेज जळगांव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना सांगितले की विविध पुस्तकांचे वाचन करून आपले आयुष्य बदलवता येते असे सांगितले. आणि हे सर्व पुस्तक आपल्याला करिअर कट्टा मार्फत सहज उपलब्ध होत आहे असे सांगितले. विद्यार्थ्याने यशस्वी होण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त असणारे विविध पुस्तकांचे वाचन करा असे आवाहन केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉ. गौरी राणे मॅडम यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांनींना करिअर करण्यासाठी योग्य नियोजन करा त्याचबरोबर विद्यार्थी असतांना विविध कौशल्य विकसित करून घ्यावे असे सांगितले. विद्यार्थीदशेत कौशल्यप्राप्त केल्यास यातील अनेक विद्यार्थी उत्कृष्ट असे अधिकारी घडू शकतात तर काही विद्यार्थी उत्कृष्ट असे उद्योजक घडतील परंतु हे सर्व करण्यासाठी सातत्याने मेहनत, चिकाटी यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक करिअर संसदेतील सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करिअर संसदचे संसदीय कामकाज मंत्री कु. प्रतिक्षा पाटील यांनी केले तर कार्यक्रमांचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ.विनोद नन्नवरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार करिअर संसदचे मुख्यमंत्री कु. विद्या पाटील हिने मानलेत.

Protected Content