
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दसरा मेळाव्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात रूग्णालये सुरू करण्याची महत्वाची घोषणा सुरू केली आहे.

दोन दिवसात उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जंगी मुकाबला होणार आहेत. ठाकरे हे शिवतीर्थावरून तर शिंदे हे बीकेसीच्या मैदानावरून संबोधीत करणार आहेत. दोन्ही गट जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयार करत आहेत. या आधीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यात ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार आहे. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या नावाने हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. तशी घोषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिंदे हे एनडीटीव्हीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच राज्यात सुमारे ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत २२७ ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून त्यापैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.



