जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “जिथे स्त्री सक्षम आहे, तिथे कुटुंब समृद्ध होतं आणि जिथे कुटुंब समृद्ध आहे तिथे समाज उन्नत होतो. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग स्वीकारला, हेच खरं सशक्तीकरण आहे, आणि त्या सशक्ततेचं प्रतीक म्हणजे ‘बहिणाई मार्ट’,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी-बांभोरी परिसरातील स्त्री शक्ती महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘बहिणाई मार्ट’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झाले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी या उपक्रमाला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सरकार महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. गावागावातून उद्योजिका तयार होतील, याची आम्हाला खात्री आहे. पाळधीच्या मातीतून आता बचत गटांचा स्वतःचा ब्रँड निर्माण व्हावा, उत्पादनातून ओळख तयार व्हावी आणि महिलांना थेट बाजारपेठ मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे. बचत गटांनी वेळेत केलेली कर्जफेड यामुळे बँकांमधील त्यांचा विश्वास वाढला असून, त्यांची पत उंचावली आहे. आज बचत गट हे केवळ महिलांचे बचतीचे माध्यम राहिले नसून, समाज बदलवण्याचे शक्तिकेंद्र बनले आहेत, असेही पाटील यांनी नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ‘स्त्री शक्ती हेच खऱ्या अर्थाने बचत गटांचं सामर्थ्य आहे’ असे मत व्यक्त केले. महिलांनी बचतीचे महत्त्व ओळखून जिद्दीने व्यवसाय वाढवावा, असे आवाहन करत, प्रशासनाच्या दृष्टीने बचत गट हे अत्यंत विश्वासू घटक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी माहिती दिली की, जिल्ह्यातील ३० हजार बचत गटांना आतापर्यंत ७५० कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले असून, आगामी काळात दरवर्षी ८०० ते १,००० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी ग्रामसंघाच्या कार्यालयासाठी सहकार्य देण्याची ग्वाही दिली. आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक अरुण पवार यांनी आदिवासी महिलांसाठीच्या योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. स्त्री शक्ती महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा उषाबाई पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक किरण महाजन यांनी केले, तर कृषी सखी आशा पाटील आणि सुवर्णा साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. पूनम पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच लक्ष्मीताई कोळी, उपसरपंच दिलीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई, अनिल कासट, मच्छिंद्र साळुंके, चंदू माळी, दिगंबर सोनवणे, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक, संजय महाजन, समाधान पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, सचिन पवार, रवी चव्हाण सर, विविध बँकांचे मॅनेजर यांच्यासह पाळधी-बांभोरी जिल्हा परिषद गटातील बचत गटांच्या महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.