स्पीकरच्या आवाजावरून वृध्दाला मारहाण; पोलीसात तक्रार !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका वृद्धाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना पिंप्राळा हुडको परिसरात शुक्रवार २० जून रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. या संदर्भात शनिवारी २१ जून रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळा हुडको येथील रहिवासी रशीद खान इस्माईल खान पठाण (वय ८०) हे शुक्रवारी २० जून रोजी रात्री ११ वाजताघरी असताना, त्यांच्या घराबाहेर स्पीकरचा मोठ्याने आवाज सुरू होता. हा आवाज कमी करण्यास सांगण्यासाठी रशीद खान बाहेर गेले. त्यावेळी संशयित आरोपी गौरव मोरे (पूर्ण नाव अज्ञात, रा. पिंप्राळा हुडको) याने वृद्धाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने शिवीगाळ करत रशीद खान पठाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे घाबरलेल्या रशीद खान इस्माईल खान यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार, गौरव मोरे याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करत आहेत.