समाजामध्ये विज्ञानाबद्दलची जाणीव विकसित होणे आवश्यक – पद्मश्री डॉ. शरद काळे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आजचे युग विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे असे आपण म्हणतो मात्र विज्ञानाबद्दलची शास्रीय माहिती आपल्याला नसते त्यामुळे पर्यावरण आणि समाजस्वास्थ्य या संदर्भातील प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांवर मात करायची असेल तर आपल्या प्रत्येकामध्ये विज्ञानाबद्दलची जाणीव विकसित झाली पाहिजे असे मत पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी व्यक्त केले.

१८ डिसेंबर रोजी विज्ञानधारा या विषयावर ‘ग्रंथाली’, मुंबई आणि केसीई सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालय, शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संवादात ते बोलत होते.

आपण रोज वापरत असलेल्या वस्तू आणि पदार्थांचा पुनर्वापर ही काळाची गरज आहे. तसे केले तरच पर्यावरणाचे आणि पर्यायाने आपले संरक्षण होऊ शकेल असेही ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रेरक ठरणाऱ्या अनेक बाबी त्यीनी उलगडल्या.

व्याख्यानाच्या दुसऱ्या सत्रात मुंबई येथील सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सतीश नाईक यांनी आरोग्य या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विविध प्रकारचे आजार उद्भवण्याअगोदरच प्रत्येकाने काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केले. तरूणांनी आपल्या शारिरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी स्वतःच घेतली पाहिजे आणि समाजामध्ये त्याविषयीची जनजागृती केली पाहिजे असेही ते म्हणाले.

व्याख्यानाच्या तिसऱ्या सत्रात मुंबई येथील बालरोगतज्ज्ञ व पर्यावरण प्रेमी डॉ. हेमंत जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला उदासिनता टाळण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला खेळ आणि शिस्त दोन गोष्टींची आवश्यकता असते. त्यामुळे आपण अधिक सुंदर आयुष्य जगू शकतो. आपल्या आहारातील आणि विचारातील शिस्त अत्यंत महत्वाची आहे, याचे भान समाजातील प्रत्येकाला असणे अत्यावश्यक आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वखर्चाने तयार केलेली आनंदी आणि तणावमुक्त जगणे याविषयावरील माहितीपत्रके उपस्थित विद्यार्थ्यांना दिली व त्याचे महत्व समजावून सांगीतले.

वरील सर्व सत्रांमध्ये आरोग्य व विज्ञान या विषयावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन उपस्थित वक्त्यांनी केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे होते. यावेळी व्यासपीठावर केसीई सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्रशासकीय अधिकारी, शशिकांत वडोदकर आदी मान्यवर उपस्थित होते. दुपारच्या सत्रात के.सी.ई.सोसायटी संचलित ओरिऑन सीबीएसई व ए.टी. झांबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना पद्मश्री डॉ. शरद काळे तसेच डॉ. सतीश नाईक यांनी आरोग्य व विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.गोपीचंद धनगर यांनी मानले.

सायंकाळी ५.०० वाजता आरोग्याची कॅप्सुल या विषयावर डॉ. सुधीर शहा यांची डॉ.सतीश नाईक, मुंबई यांनी रेडीओ मनभावन ९०.८ केंद्रावर मुलाखत घेतली ती यथावकाश प्रसारित करण्यात येणार आहे.

Protected Content