अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे ‘जंकफूड’ बाबत जनजागृती

जळगाव प्रतिनिधी | अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे जंकफूड टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयात जंकफूडची विक्री होणार नाही याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती ‘माहिती अन्न व प्रशासन विभागा’चे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे जंकफूड टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयात जंकफूडची विक्री होणार नाही याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी मुलांची प्रत्यक्ष भेट घेवून भविष्यात जंकफूडचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेण्यात आली

श्री.पाटील यांनी म्हटले आहे की, “मुले ही भावी नागरिक आहेत. देशाचे भवितव्य त्यांच्या हाती असणार आहे. या मुलांचे आरोग्य हे लहानपणापासूनच उत्तम असणे गरजेचे आहे. याविषयी सर्वेक्षण करुन एक निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यात मुले जंकफूडच्या आहारी गेलेली आहेत. मुलांना घरचा पोळी- भाजीचा डबा त्यातून आवश्यक पोषण तत्वे मिळतात. मात्र शाळा, कॉलेज, कँटीन येथे सहज उपलब्ध असणारे जंकफुड मुले खातात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे चार- पाच वर्षांच्या मुलांना चष्मे लागतात. त्यांना मधुमेह होतो. त्यांच्यात लठठपणा येतो. त्यामुळे ते सुस्तावतात. खेळत नाहीत, परिणामी त्यांची शारीरिक वाढ खुंटते. मुले निरोगी असतील, तरच त्यांचे अभ्यासात लक्ष लागते. आकलनशक्ती वाढून अभ्यासात प्रगती होते. नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड वाढते. तब्येतीच्या कुरबुरी चालू असतील, तर साहजिकच एकूण शारीरिक व मानसिक वाढीवर लगाम लागतो”

जंकफुड म्हणजेच शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषणतत्त्वांचा अभाव व भरपूर मीठ, साखर व फॅटसचा अंतर्भाव असलेला आहार होय. उदा. केक, बिस्किटस, चॉकलेट, चीप्स्, सॉफ्ट ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा इ. परंतु, या जंकफूडचे आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होतात. विशेषत: लहान मुले जंकफूडचे सेवन जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर परिणाम होतो. मुलांचा स्वभाव हा लहरी बनतो. त्यांना थकवा येवून सुस्ती येते. मुलांमध्ये कमी एकाग्रता, कमी आकलनशक्ती असे परिणाम दिसून येतात. त्याचप्रमाणे, शारीरिक विकासातदेखील अडथळे येतात. मुलांमध्ये लठ्ठपणा, मेदवृद्धी तसेच टाइप-2 मधूमेह, मूत्रपिंड विकार हेदेखील उद्भवण्याचा धोका वाढतो.

मुलांना जंकफूड खाण्यापासून परावृत्त करणेसाठी त्यांना सकाळी व सायंकाळी त्यांच्या भुकेच्या वेळी ताजी फळे, सुकामेवा, बटर मिल्क, नारळ पाणी, लिंबूपाणी इ. असे पदार्थ उपलब्ध करुन द्यावेत. जेणेकरुन भूकही भागेल व शरीराला आवश्यक पोषणतत्वे देखील मिळतील. मुलांच्या आहारात मैदा, मीठ, साखर, तेल यांचे अनावश्यक सेवन होणार नाही, याबाबत कटाक्ष ठेवावा. अशी माहिती जनजागृतीच्या माध्यमातून दिली जात आहे.
अन्न व औषध प्रशासनातर्फे जंकफुड टाळणेविषयी जनजागृती करण्याच्या उददेशाने शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्यांशी भेटून त्यांच्या शैक्षणिक आवारात जंकफुडची विक्री होणार नाही याविषयी दक्षता घेणेबाबत जागरुकता केली आहे. तसेच, प्रत्यक्षात मुलांच्या भेटी घेवून भविष्यात जंकफूडचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेण्यात आली व जनजागृती करण्यात आली आहे ” असेही श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

Protected Content