फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऐतिहासिक आणि शांतताप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फैजपूर शहरात काही समाजकंटकांकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहराच्या नावावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज मंचाने केली आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, फैजपूर शहर हे ऐतिहासिक आणि पवित्र भूमी आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते आजपर्यंत अनेक राष्ट्रीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम या शहरात झाले आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, काही समाजकंटक शहराचे नाव बदलून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
शहरात अनेक ठिकाणी या समाजकंटकांनी शहराचे नाव बदलणारे बॅनर लावले आहेत. यामुळे शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शहराचे वातावरण खराब होऊ नये म्हणून, या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम समाज मंचाने केली आहे. मुस्लिम समाज मंचाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर अब्दुल रऊफ जनाब, शेख जफर, शेख कुरबान, अनवर खाटीक, रियाज मेंबर, आसिफ मेकॅनिक, याकुब खान, फिरोज सेठ, वसीम जनाब, मुदस्सर नजर, सलीम उस्मान, मोहम्मद रियाज, जलील खान, असलम खान, शेख मोहसीन यांच्यासह अनेक सदस्यांच्या सह्या आहेत.