जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दादावाडी येथील एन.एन.वाईन दुकानात काम करणाऱ्या एकाला चॉपरचा धाक दाखवत दमदाटी करून दररोज एक बिअर आणि दर महिन्याला १० हजार रूपये द्यावे लागतील असे सांगून तीन जणांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना मंगळवार १ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, दादावाडी येथील गुजराल पेट्रोल पंपाजवळी एन.एन.वाईन शॉप आहे. या दुकानावर अमोल कोळी हा तरूण कामाला आहे. मंगळवारी १ एप्रिल रोजी रात्री १० वाजता अमोल हा दुकानावर असतांना संशयित आरोपी आकाश पाटील रा. जळगाव, गंप्या उर्फ अक्षय राठाडे रा.पिंप्राळा आणि दिपेश उर्फ फॉक्सन पाटील रा. मानराज पार्क, जळगाव या तिघांनी दुकानावर येवून बिअर घेतली. अमोल याने बिअरचे पैसे मागितले या रागातून तिघांनी अमोल याला शिवीगाळ करत हातात चॉपर घेवून, धंदा करायचा असेल तर मला दररोज बिअर व महिन्याला १० हजार रूपये द्यावे लागतील असे सांगून धमकी दिली. या घटनेनंतर अमोल कोळी याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे.