
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी स्वतः शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत प्रोत्साहन देत पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना घरच्या घरी इंग्रजी, गणित आणि मराठी या विषयांचे ज्ञान मिळवून देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी निपुण भारत अभियानात सहभागी होऊन मूलभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करावीत तसेच आपली शाळा अधिक उत्तम आणि गुणवत्तापूर्ण कशी होईल यासाठी पालकांनी शाळेला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी करिष्मा नायर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कोमल रवींद्र सोनवणे हिने मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांची आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी मुलाखत घेतली. तिच्या धाडसी संवादकौशल्याचे नायर यांनी कौतुक करत तिला प्रोत्साहन दिले. शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून गावातून विशेष आकर्षण ठरलेली बैलगाडी सजावट करून इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. लेझीम पथकाच्या तालावर आणि आदिवासी गीतांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यात आला. पारंपरिक पद्धतीने नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मीना तडवी, मुख्याध्यापक नामदेव गुरुजी, पोलीस पाटील पंकज बडगुजर, सेवानिवृत्त शिक्षक छबीर तडवी गुरुजी, लक्ष्मण बडगुजर, अकबर तडवी तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय राहिली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण तसेच पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी शाळांमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली.



