Home Cities यावल जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवृष्टीने स्वागत

जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवृष्टीने स्वागत

0
20


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. १५ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

शालेय जीवनातील पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. हा दिवस आनंददायी आणि प्रेरणादायी ठरावा, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक सुरुवात व्हावी, या उद्देशाने शाळेच्या शिक्षकवृंदांनी विशेष नियोजन करून भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रंजना महाजन होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जे. टी. महाजन आयटीआय कॉलेजचे प्राचार्य श्री. गिरीश वाघुळदे सर, आयटीआयचे प्रवीण झोपे सर, जे. टी. महाजन इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे, पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे तसेच गौरी भिरूड यांची उपस्थिती होती.

मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आपुलकीचे आणि आनंददायी वातावरण निर्माण केले. यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या विशेष स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी नृत्य करत उत्साह व्यक्त केला.

शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही नव्या उत्साहाने शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. शाळेतील सकारात्मक वातावरणामुळे नवीन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमधील हा शाळा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंद, उत्साह आणि प्रेरणेचा ठरला. औक्षण, पुष्पवृष्टी, भेटवस्तू आणि मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत हा पहिला दिवस कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound