फैजपूर, प्रतिनिधी | वृक्षतोड, कारखानदारी, हरितगृहांचा अतिरेक, वाहनांची प्रचंड संख्या आणि निसर्गात मानवी हस्तक्षेप यासारख्या असंख्य बाबींमुळे वातावरणाचा समतोल बिघडत असून हवा अशुद्ध होत आहे. आपण वेळीच जागे नाही झालो तर लवकरच प्रत्येकाला दैनंदिन कामकाज करतानाही प्राणवायूचे सिलेंडर सोबत घेऊन फिरावे लागेल. एन.सी.सी. कॅडेटने घराघरात वायू प्रदूषणाशी लढा देण्यासाठी जागृती करावी. वातावरण शुद्धी ही सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन ग्लोबल पीस फाउंडेशनचे संचालक डॉ. राजहंस यांनी आज येथे केले. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आयोजित ‘वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
१८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर आणि प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील एन.सी.सी. अधिकारी प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपूत हे प्रदूषणमुक्त पंधरवाडा साजरा करीत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आज एन.सी.सी. कडेट आणि इतर विद्यार्थ्यांना वायु प्रदूषणाचे धोके आणि उपाय याविषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. राजहंस, योगगुरू रघुनाथ वामन टोके यांना आमंत्रित करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलतांना डॉ. राजहंस यांनी वायू प्रदूषणासाठी कारणीभूत घटक आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यासोबत योगगुरू रघुनाथ टोके यांनी प्रदूषणाचा शरीरावर होणार दुष्परिणाम आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरिष चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के. चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर. चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, युवराज गाढे, नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, सुधीर पाटील, तोसिफ तडवी, दुर्गेश महाजन, राहुल उन्हाळे, महेश पाटील यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.