दहिगावात आषाढी एकादशीचा महासोहळा: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांचा जनसागर


यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त भव्य यात्रा उत्सव पार पडला. हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन विठुरायाचे दर्शन घेतले.

या उत्सवासाठी मंदिर ट्रस्टतर्फे १० हजार राजगिरा लाडू, साबुदाणा फराळ आणि चहा वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, रेड क्रॉस ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

सकाळी ५ वाजता नवविवाहित पाच जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. सकाळी १० वाजता फराळ वाटपास सुरुवात झाली. शिरसाळा, साखळी, चिंचोली, चुचाळे आदी गावांतून पायी दिंडी सोहळे दहिगावात दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. दिवसभर मंदिरात भावगीते आणि भजनांचा कार्यक्रम सुरू होता. सायंकाळी ५ वाजता मंदिरापासून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला. या दिंडी सोहळ्यात बहुसंख्य भाविकांची गर्दी उसळली होती आणि विठ्ठल नामाच्या गजरात सारे दहिगाव दुमदुमून गेले होते.

या सोहळ्याला रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे आणि यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. आमदार जावळे यांनी यावेळी पांडुरंगाकडे “यावल तालुक्यातील माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त कर” अशी मागणी केली, तसेच शेतकरी आणि नागरिक सुख-समृद्धीने राहोत अशी प्रार्थना केली.

हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव कैलास पाटील, उपसरपंच देविदास पाटील, प्रमोद चौधरी यांच्यासह फराळ बनवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या भाविकांनी विशेष सहभाग घेतला.