अरुण जेटली यांच्यावर यमुना तिरी अंत्यसंस्कार

images 3

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर रविवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील यमुना नदी तिरावरील निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवाला मुलगा रोहन जेटली यांनी मुखाग्नी दिला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा, काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

रविवारी दुपारी १.०० वाजता अरुण जेटली यांच्या अंत्ययात्रेला भाजपा मुख्यालयातून सुरूवात झाली. निगमबोध घाटावर ३.०० वाजता त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी सर्व संस्कार पार पडल्यानंतर त्यांचा मुलगा रोहन जेटली यांनी अरुण जेटली यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्याआधी भाजपा मुख्यालयात अरुण जेटली यांच्या पार्थिवाचे भाजपा आणि इतर राजकीय पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले, त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

जेटली यांना ९ ऑगस्टला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना प्राणरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांनी शनिवारी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या युगातून नरेंद्र मोदी यांच्या वर्चस्वाखालील भाजप युगात सहज संक्रमण करणाऱ्या भाजपच्या मोठय़ा नेत्यांपैकी जेटली हे एक होते.

‘सुसंस्कृत आणि माध्यम जाणकार’ नेता अशी ओळख असलेल्या जेटली यांनी भाजपमध्येच नव्हे तर भिन्न राजकीय विचारधारांच्या पलीकडे जाऊन जवळजवळ सगळया पक्षांमध्ये मित्र जोडले होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पेशाने वकील असलेल्या जेटली यांनी मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्रीपद सांभाळले होते. मोदी सरकार आणि भाजप यांचे मुख्य संकटमोचक अशी त्यांची ओळख होती.

Protected Content