आम्हाला त्यावेळी थेट राष्ट्रवादीकडून ऑफर होती ; फडणवीसांचा खळबळजनक खुलासा


मुंबई (वृत्तसंस्था)
अजित पवारांसोबत 80 तासांच्या सरकारबाबत पत्रकारांनी यावर पुस्तकं लिहिली आहेत. मात्र यात खरं काय आहे याबाबत संपूर्ण घटनेचा खुलासा मी करणार आहे. मी ज्यावेळी पुस्तक लिहील, त्यावेळी मी त्यात या गोष्टीचा खुलासा करेल. सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. पण आम्हाला त्यावेळी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, असा खळबळजनक खुलासा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘दी इनसायडर’ या यूट्यूब चॅनलसाठी पत्रकार राजू परुळेकर यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. फडणवीस म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी एक स्थिती अशी आली होती की, राष्ट्रवादी आणि भाजप सोबत येणार होते. त्यावेळी पंतप्रधानांनी सांगितले की, राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे असेल तर शिवसेना देखील सोबत पाहिजेच. इतके स्पष्ट अमित शाह यांनी देखील शरद पवार यांना देखील सांगितले होते. त्यावेळी राष्ट्रवादीला आम्ही सोबत घेतले नाही. राष्ट्रवादी पूर्णपणे आमच्यासोबत यायला तयार होती. ‘फडणवीस’ आडनाव आहे, म्हणून शरद पवारांनी काही भूमिका बदलल्या, असे देखील ते फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे हे माझे मित्र आहेत, मीडियाला न समजता आम्ही अनेकवेळा बोललोय, भेटलोय. मी मुख्यमंत्री असतानाही त्यांना भेटलोय. राज ठाकरेंशी गप्पा मारायला मजा येते. त्यांच्याकडे वेगळी माहिती, वेगळं नॉलेज असते. मी त्यांच्यावर खूप टीका केलीय, त्यांनी माझ्यावर केलीय. एकमेकांची उणीदुणी काढली आहेत. पण त्यांच्याकडे वेगळा विचार आहे, त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची पद्धत आहे. माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे आले नाहीत, ते हिंदुत्वाकडे येत आहेत असे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मी त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून समजून घेतले की नेमके त्यांच्या मनात काय आहे, त्यांचा ट्रॅक करेक्ट होता, ते योग्य दिशेने होते,असेही फडणवीस म्हणाले.

Protected Content