भारत-पाकिस्तान सीमेवर दहा दिवसांत आढळला दुसरा बोगदा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरमधील हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे एक बोगदा शोधून काढला. या बोगद्याची लांबी १५० मीटर लांब असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून त्याची निर्मिती करण्यात आली होती.

दहा दिवसांच्या आत सीमेवर आढळलेला हा दुसरा बोगदा आहे. सुरक्षा यंत्रणा याबाबत अधिक तपास करत आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरू असलेल्या विशेष शोधमोहीमेत जम्मूमधीप पानसर येथे आणखी एक बोगदा आढळला आहे. बीपी नंबर १४ व १५ दरम्यान आढळून आलेला हा बोगदा जवळपास १५० मीटर लांब व ३० फूट खोल आहे.

बीएसएफने जून २०२० मध्ये याच भागात शस्त्र आणि स्फोटकं घेऊन जाणारे एक पाकिस्तानी हेक्साकॉप्टर पाडले होते. जवानांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये याच क्षेत्रातील घुसखोरीचा प्रयत्न देखील हाणून पाडला होता. आतापर्यंत जम्मू परिसरात दहाव्यांदा आणि मागील सहा महिन्यांमध्ये चौथ्यांदा बोगदा आढळून आला आहे.

या अगोदर देखील बीएसएफला ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बेंगालड परिसरात २५ फूट खोल व १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला होता. शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही तिथं सापडल्या होत्या. त्या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी ४०० मीटर अंतरावर असल्याचंही लष्करानं सांगितलं होतं.

Protected Content