गुरूंचे वरदान आणि गुरूंमुळेच उडाली दाणादाण !

suresh jain

सुरेशदादा जैन यांना कार्यकर्त्यांना मोठे करणारा नेता म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून जितके नेते त्यांनी घडविले तितके खचितच या जिल्ह्यात कुणी घडविले असतील यात दुमत नाही. मात्र याच सुरेशदादांनी जळगावातील राजकारण्यांच्या एका पिढीची कारकिर्द खलास करण्याचे काम केले यालादेखील कुणी नाकारणार नाही. एका अर्थाने ज्या राजकीय गुरूने भरभरून दिले त्यांच्याच मुळे चेल्यांची दाणादाण उडाल्याचे चित्र आज दिसून येत आहे.

सत्तरच्या दशकाच्या अखेरीस सुरेशदादा जैन यांचा जळगावच्या राजकारणात झालेला उदय हा अनेकांना आश्‍चर्यकारक वाटेल असाच होता. तेव्हादेखील शहरात लेवा पाटीदार, कोळी आणि मराठा समाजाचे प्राबल्य होते. मुस्लीम समाजदेखील निर्णायक अवस्थेत होता. या पार्श्‍वभूमिवर, अत्यल्प समाजातील सुरेशदादा जैन यांनी चतुराईने आपल्याकडच्या अर्थशक्तीला ‘सोशल इंजिनिअरिंग’ची जोड दिली. त्यांनी तेव्हा राजकारणात केंद्रस्थानी असणार्‍यांना शह देण्यासाठी नव्या दमाच्या सहकार्‍यांना हेरले. शहरातील प्रमुख समाजच नव्हे तर बारा बलुतेदार समाजांमधील चुणचुणीत कार्यकर्ते हेरून त्यांना सोबत घेतले. याचा लाभ त्यांना राजकीय वाटचालीत झाला. या दरम्यान, त्यांनी अनेक गावगुंडांना ‘व्हाईट कॉलर्ड’ बनविले. त्यांच्या वैध-अवैध व्यवसायांना संरक्षण दिले. विविध पदांच्या माध्यमातून प्रतिष्ठा दिली. नव्वदच्या दशकाच्या मध्यावर त्यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी दिली. अर्थात, केवळ नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती वा नगराध्यक्षच नव्हे तर बाजार समिती, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ व एवढेच नव्हे तर विधानपरिषदेवरही सुरेशदादा जैन यांच्या असंख्य समर्थकांची वर्णी लागली. अनेकांना भुखंडांची खिरापत मिळाली. बर्‍याच जणांनी विविध समित्यांवर वर्णी लाऊन घेत आपले उखळ पांढरे करून घेतले. एकीकडे आपल्या समर्थकांना मोठे करणारे सुरेशदादा हे राज्याच्या राजकारणात प्रगतीच्या पायर्‍या फटाफट चढत गेले. समाजवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा राजकीय प्रवासात ते कधी कुणासमोर झुकल्याचे अथवा याचक बनल्याचे दिसले नाही. जनतेच्या हितासाठी एकदा नव्हे तर शंभरदा पक्ष बदलणार असल्याचे ते वारंवार म्हणून लागले. अगदी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्यासाठी थेट मातोश्री गाठून राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी निर्भयतेने बोलणारे सुरेशदादा हे वेगळेच रसायन असल्याचे याचवेळी सर्वांच्या लक्षात आले. मात्र एकीकडे यशाची नवनवीन शिखरे गाठत असतांना काही चुकांची त्यांना जबर किंमत मोजावी लागली.

आपण स्वत: ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे त्याच पक्षाला सडविण्याचा जाहीर संकल्प सुरेशदादा जैन यांनी व्यक्त करताच बारामतीकरांनी कान टवकारले. तर दुसरीकडे जळगावातून नरेंद्रअण्णा पाटील व उल्हास साबळे यांच्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्यांना एकनाथराव खडसे यांच्यासारख्या खमक्या नेत्याचे पाठबळ मिळाले. उरली-सुरली कसर २०१० साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भरून निघाली. या निवडणुकीत एकनाथराव खडसे यांच्या पुत्राला पराजीत करण्यात करण्याचा क्षणभंगुर आनंद सुरेशदादा आणि त्यांच्या कंपूला मिळाला. मात्र घरकूलच्या अटकसत्राने याची परतफेड करण्यात आली. तर आता याच प्रकरणाच्या निकालाने या बदल्याचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. मात्र या सर्व प्रकारात फरफट झाली ती सुरेशदादांच्या विश्‍वासू सहकार्‍यांचीच ! ‘सुरेशदादा म्हणतील ती पूर्व दिशा’ समजून नगरपालिकेच्या प्रत्येक ठरावावर स्वाक्षरी करतांना या नगरसेवकांना तेव्हा आपले कोण काय वाकडे करणार ? हेच वाटले असेल. कदाचित या स्वाक्षर्‍यांसाठी त्यांना गलेलठ्ठ पाकीटदेखील मिळाले असेल. मात्र सुरेशदादा जैन हे सर्वशक्तीमान असल्याचा आभास हा काळाने जसा फोल ठरविला अगदी त्याच प्रकारे नगरसेवकांची बेपर्वाईदेखील चुटकीसरशी उडून गेली. यामुळे आपला नेता आणि त्यांच्या भोवतीच्या चौकडीसोबत कारागृहात फरफटत जाण्याचे भोग त्यांच्या नशिबी आले.

सुरेशदादा जैन यांच्या सोबतचे लोक निश्‍चीत मोठे झाले. त्यांनी विविध पदे उपभोगली. अगदी कंगाल असणारेदेखील करोडपती झाले. झोपडीतून महालात राहण्यासाठी गेले. अनेक वैध-अवैध व्यवसायांचे साम्राज्यदेखील त्यांनी उभे केले. मात्र ज्यांच्यामुळे नशीब फळफळले त्यांच्याचमुळे कारागृहात जाण्याची वेळ या मंडळीवर आली आहे. म्हणजेच त्यांच्या राजकीय गुरूनेच या मंडळीच्या राजकीय कारकिर्दीचा घात केल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारण म्हणजे देण्या-घेण्याचा सौदा मानला जातो. याचा विचार करता, जळगावात सुरेशदादांनी आपल्या समर्थकांना बरेच काही दिले. मात्र त्यांच्याकडून गुरूदक्षिणेच्या स्वरूपात जे काही घेतले वा काळाने जे घेण्यास भाग पाडले ते भयंकर आहे. जिल्ह्यातील दुसर्‍या फळीतील अन्य नेत्यांनी यापासून धडा घेण्याची गरज आहे.

Protected Content