धनकेंद्रीत राजकारणाला निर्णायक वळण; दादा-बाबूजींचे वारसदार कोण ?

jain and jain

जळगाव प्रतिनिधी । शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी ईश्‍वरबाबूजी जैन अडचणीत आल्यानंतर घरकूलमध्ये सुरेशदादा जैन यांना झालेली शिक्षा ही जिल्हा राजकारणातील धनकेंद्रीत राजकारणाला नवीन वळण देणारी असल्याचे दिसून येत आहे. सुमारे चार दशकांपासून राजकारणात वर्चस्व कायम राखणार्‍या या दोन्ही दिग्गजांचा राजकीय उदय व अस्तदेखील एकाच कालखंडात व्हावा हा विलक्षण योगायोग होय. आता त्यांच्यानंतर पैशांवर आधारित राजकारणाची सूत्रे कुणाकडे जातील; किंबहुना कोण याचा यशस्वी वापर करेल याची उत्सुकता लागली आहे. या अनुषंगाने इतिहास व वर्तमानातील घटनांचा उहापोह करून भविष्याचे वेध घेणारे हे विशेष राजकीय भाष्य.

विलक्षण योगायोग

राजकारणात माइंड, मसल, मनी आणि मिस्टेक हे चार ‘एम’ अतिशय महत्वाचे आहेत. कुणीही हुशारीने राजकारणात यशाच्या पायर्‍या झपाट्याने चढतो. कुणी निर्दयीपणे विरोधकांचे निर्दालन करतो. कुणी धनाचा लोभ दाखवून विरोधकांना आपलेसे करतो. तर, कुणी भूल-चुकीने राजकारणात यशस्वी ठरतो. काही जण यालाच नशीब म्हणतात. याचा विचार करता जिल्हा राजकारणातील तिसरा ‘एम’ अर्थात ‘मनी फॅक्टर’ देखील बराच महत्वाचा असल्याचे दिसून आले आहे. अलीकडचे दाखले द्यायचे तर २०१०च्या अखेरीस झालेली विधानपरिषद तर २०१४ सालच्या अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या घटना लागलीच आठवतात. खरं तर, ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत लक्ष्मीदर्शन हा महत्वाचा घटक बनल्याचे दिसून येत असून प्रत्येक यशस्वी राजकारणी याचा नेहमीच वापर करत असल्याची बाब उघड आहे. मात्र पैशांवर आधारित यशस्वी राजकीय कारकिर्दीची जिल्ह्यातील दोन सर्वात मोठी उदाहरणे ही अर्थातच माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांची आहेत. जवळपास एक-दोन वर्षे पुढे-मागे राजकीय कारकिर्द सुरू झालेल्या या दोन्ही मातब्बरांचा राजकीय अस्त एकाच कालखंडात व्हावा हादेखील विलक्षण योगायोग मानावा लागेल.

सत्तेतून पैसा आणि पैशांमधून सत्ता

खरं पाहता, बाबूजी हे खर्‍या अर्थाने गर्भश्रीमंत अर्थात लक्ष्मीपुत्र होते. तर सुरेशदादा हे सधन घरातील असले तरी त्यांचा अर्थोदय राजकारणात आल्यानंतर सुपरफास्ट गतीने झाला हे नाकारता येणार नाही. सुरेशदादा जैन यांनी तत्कालीन राजकीय नेतृत्वाची पोकळी भरून काढतांना सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला. याच्या जोडीला गावगुंडांना ‘व्हाईट कॉलर्ड’ बनवून (सध्या भाजपकडे असणारी ‘वॉशिंग मशिन’ ही आधी ‘लोकल लेव्हल’वर त्यांच्याकडे होती !) त्यांना आपल्या अंकीत करण्याचा पॅटर्नदेखील त्यांच्या यशात निर्णायक ठरला. यामुळे शहरातील गुंडगिरी नक्कीच कमी झाली. मात्र थेट गुंडांनाच त्यांनी प्रतिष्ठीत बनविले हेदेखील नाकारता येत नाही. दादांनी जळगावात जातीनिहाय आणि वॉर्डानुसार वतनदार तयार केले. या मंडळीची आपापल्या परिसरात विलक्षण पकड होती. या सर्वांना मुठीत ठेवून सुरेशदादा जैन हे जळगावचे अनभिषीक्त सम्राट बनले. सत्तेतून पैसा आणि पैशांमधून सत्ता हे गणीत त्यांनी यशस्वीपण सांभाळले. काही वर्षांमध्येच जळगावच्या आमदारकीसह नगरपालिकेवर पक्की मांड ठोकल्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाकडे आपला मोर्चा वळविला. तेव्हा राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रांमध्ये तेजाने तळपत असणार्‍या मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील, जे.टी. महाजन, प्रल्हादराव पाटील आदी नेत्यांना नामोहरम करण्यासाठी सुरेशदादांनी धनशक्तीचा आश्रय घेतला. यात राजकीय तोडफोड करण्यासाठी आवश्यक असणार्‍या धनशक्तीमुळे अन्य नेत्यांना अडचणी निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.

बाबूजींचा व्यवहारवाद

एकीकडे सुरेशदादांच्या प्रगतीचा वारू वेगाने दौडत असतांना दुसरीकडे ईश्‍वरबाबूजी जैन यांनीदेखील राजकीय यशाच्या पायर्‍या झपाट्याने चढल्या. १९७८ साली जळगाव तर लागलीच १९८० मध्ये ते जामनेरमधून विधानसभेवर गेले. यानंतर नव्वदच्या दशकात सुरेशदादा आणि ईश्‍वरबाबूजी यांच्यासमोर अनुक्रमे एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्या रूपाने प्रतिस्पर्धी समोर ठाकले. दादा आणि खडसे हे समोरासमोर कधीच आले नसले तरी गिरीश महाजनांनी बाबूजींना जामनेरच्या आखाड्यात दोनदा आस्मान दाखविले. यानंतर बाबूजी हे कोणत्याही थेट राजकीय निवडणुकीत कधीच उतरले नाहीत. पुढे राष्ट्रवादीच्या खजिनदारपदाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या राजकारणात आपले बस्तान बसविले. मध्यंतरी त्यांच्याकडे जिल्हा राष्ट्रवादीचीही सूत्रे होती. तर शेवटी राज्यभेत जाऊन ते बाजूला सरले. दरम्यान, ‘गिरीश महाजन यांच्याशी टक्कर म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे’ असल्याचे जाणून घेत त्यांनी हुशारीने तह करून घेतला. परिणामी, कधी काळचे सुपारीबाग आणि अडकित्ता बागेचे कट्टर प्रतिस्पर्धी आता एकमेकांचे निकटवर्तीय आहेत. गिरीशभाऊ हे आपले मानसपुत्र असल्याचे बाबूजी वारंवार म्हणतात ते याचमुळे !

स्वयंप्रकाशीत ते परप्रकाशीत

तर दुसरीकडे सुरेशदादा जैन यांनी एकनाथराव खडसे यांच्याशी कधी जुळवून घेत तर कधी प्रखर विरोध करून आपली यशस्वी वाटचाल सुरूच ठेवली. २००१ सालच्या जळगाव लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत खडसेंनी दादा गटाला दणका दिला. नंतरच्या विधानसभा पोट निवडणुकीत दादांचा पराभव होता होता राहिला. यानंतर २०१० मध्ये विधानपरिषदेत खडसेपुत्र निखील यांच्या पराभवात सुरेशदादांचा मोलाचा वाटा राहिला. यात पैशांचे अतिशय ओंगळवाळे प्रदर्शन झाले. अर्थात, येथेच पुढील घटनासत्रांचे बिजारोपण झाले असून आजच्या घटना हे याचे दृश्य परिणाम आहेत. एकीकडे घरकुलमुळे दादा कारागृहात असून शिखर बँकेतील गैरव्यवहारामुळे बाबूजींवर कारवाईची टांगती तलवार आहे. यामुळे आता धनकेंद्रीत राजकारणाचा केंद्रबिंदू नेमके कुठे असेल याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कधी काळी बाबूजींचे पुत्र मनीषदादा जैन यांच्याकडून खूप अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. तथापि, ते सध्या तरी राजकारणातून बाजूला झाले आहेत. सध्या आमदार चंदूभाई पटेल, गुरूमुख जगवाणी आदींसारखी व्यापारी मंडळी राजकारणात तळपत आहेत. तथापि, दादा व बाबूजी हे स्वयंप्रकाशित होते. तर पटेल व जगवाणी हे अन्य मातब्बर नेत्यांच्या छायेखालचे राजकारणी असल्याचा फरक लक्षात घेण्याजोगा आहे. यामुळे ते जैनद्वयींची जागा घेतील असे सध्या तरी वाटत नाही.

इतर नेतेदेखील पारंगत

खरं तर आता व्यापारी समुदायच नव्हे तर अन्य राजकारण्यांकडेही रग्गड पैसा आलेला आहे. यामुळे कोणत्याही निवडणुकीत पाण्यासारखा पैसा वाहवण्याचा पॅटर्न हा घट्ट रूजण्यास प्रारंभ झालाय. गेल्या महापालिका निवडणुकीत याचे भयंकर स्वरूप आपल्यासमोर आलेच आहे. यामुळे आता पैशांवर आधारित राजकारण ही अपरिहार्यता असल्याचेही सिध्द झालेले आहे फरक इतकाच की, आधीच सुरेशदादा व ईश्‍वरबाबूजींसारख्या लक्ष्मीपुत्रांनी याचा चातुर्याने वापर केलाय. तर आता अन्य समुदायातील नेतेही तिजोरीची कुलुपे उघडण्यात पारंगत झालेले आहेत. यामुळे धनकेंद्रीत राजकारणातील स्थित्यंतराचे पर्व जळगाव जिल्हावासीय अनुभवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content