Home Cities जळगाव पावसाळ्यापूर्वी स्मशानभूमीची दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा

पावसाळ्यापूर्वी स्मशानभूमीची दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवार, ७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष तथा धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन देऊन स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत सविस्तर चर्चा करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करणारे निवेदन प्रशासनाला सादर केले.

विनायक पाटील यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले की, शिवाजीनगर येथील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानच्या सुरक्षा भिंतींची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी बांधण्यात आलेले ओटे पूर्णपणे खचले असून, त्यावरील लोखंडी जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. सर्वात भयावह परिस्थिती येथील छताची असून, ते अतिशय जीर्ण झाले आहे. हे छत कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या विविध समस्यांमुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या मानसिक आणि शारीरिक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

विशेष म्हणजे, या संदर्भात माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील विकासकामांचे प्रस्ताव मंजूरही झाले आहेत. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे ही मंजूर कामे अद्याप केवळ कागदावरच राहिली आहेत. प्रत्यक्ष कामाला मुहूर्त मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने, जर ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना छताअभावी आणि चिखलामुळे परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.

निवेदन देतेवेळी विनायक पाटील यांनी मागणी केली की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात यावी. जर पावसाळ्यापूर्वी येथील छताची आणि ओट्यांची दुरुस्ती झाली नाही, तर नागरिकांच्या सोयीसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound