जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून तीव्र उष्णतेची लाट जाणवत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) विविध कामांसाठी येणाऱ्या वाहनमालक, चालक आणि अनुज्ञप्तीधारकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरटीओ कार्यालयातील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच परवाना चाचणीच्या अपॉइंटमेंट वेळेत आता तात्पुरता बदल करण्यात आला असून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, कच्ची व पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स) चाचणी यांसारख्या कामांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. ही कामे मैदानी स्वरूपाची असल्याने वाहनधारकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कार्यालयातील पूर्वीच्या वेळेत बदल केला आहे. आता ही सर्व कामे सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत या वेळेतच पूर्ण केली जाणार आहेत. हा बदल तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आला असून यामुळे नागरिकांना कडाक्याचे ऊन सुरू होण्यापूर्वी आपली कामे आटोपून घेणे शक्य होणार आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना आवाहन केले आहे की, सर्व नागरिक, वाहनधारक व अनुज्ञप्तीधारक यांनी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच कच्ची व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी बदललेल्या नवीन वेळेची नोंद घ्यावी. यापुढे वरील कालावधीतच (सकाळी ८ ते दुपारी २) अपॉइंटमेंट घेतल्या जातील. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे. वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



