मुंबई-वृत्तसेवा | उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांनी केंद्र सरकार, भाजप आणि राज्यपालांवर जोरदार टीका करत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या धमकीमुळे “ऑपरेशन सिंदूर” थांबवण्यात आले, असा दावा करत सत्ताधाऱ्यांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजेत, असे राऊत म्हणाले.
पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. “भाजपला पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडवून त्याचे लोण देशभरात पसरवायचे आहे. पुढील दोन वर्षांत देशभरात अस्थिरता निर्माण करून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. बंगालमध्ये आतापर्यंत सात जणांचा बळी गेला असून अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

Mamata Banerjee यांच्या भूमिकेचे समर्थन करताना राऊत म्हणाले की, “मी निवडणूक हरले नाही, तर कट रचून माझा पराभव करण्यात आला,” असे ममता बॅनर्जी सातत्याने सांगत आहेत. सुमारे ९० लाख मते कापण्यात आली असून त्यातील २७ लाख मतांचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्री कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी टीकाही त्यांनी केली.
पंजाबमध्ये झालेल्या स्फोटांच्या घटनेचाही उल्लेख करत राऊत म्हणाले की, “पंजाबमध्ये यापूर्वी असे स्फोट झाले नव्हते. आता भाजप निवडणुकांची तयारी करत असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री सांगत आहेत. बंगालमधील हिंसाचारासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे.” तामिळनाडूमध्येही राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण न दिल्याचा आरोप करत त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.
नाशिक येथील Kalaram Temple येथे धर्मध्वज फडकावण्याच्या कार्यक्रमावरूनही राऊत यांनी भाजपवर टीका केली. “भाजपला हिंदुत्वावर एकाधिकार असल्यासारखे वाटते. काळाराम मंदिर हे शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी जोडलेले आहे. या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबातील कोणाला तरी बोलावायला हवे होते,” असे ते म्हणाले. पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी नाशिकमध्ये २०२९ ची तयारी सुरू झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, “धर्मध्वजावर हनुमानाचे चित्र घेतले जाते, पण पक्षात गद्दारांना स्थान दिले जाते. हिंदुत्वाच्या नावाखाली हे खेळ करून हिंदुत्वाला बदनाम करू नका.” Aarey Colony येथे हजारो झाडांची तोड झाल्याचा उल्लेख करत त्यांनी उद्योगपतींसाठी जंगलतोड सुरू असल्याचा आरोप केला.
कुंभमेळा निधीवरूनही राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले. “कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. इतक्या मोठ्या निधीत नेमकी कोणती कामे होणार, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. हे पैसे गुजरातच्या ठेकेदारांनाच देण्यासाठी नियोजन सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.



