माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत खडसे यांनी विविध पदांच्या माध्यमातून केलेली कामे जगासमोर आहेतच. पण यातील एक महत्वाचा आयाम म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य तसे दुर्लक्षीत राहिले आहेत. अवघ्या राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपदाची धुरा अवघी तीन-चार महिने असतांना त्यांनी मैलाचा दगड ठरतील असे अनेक निर्णय घेतले असून याचा व्यापक परिणाम झाला आहे. नेमक्या याच मुद्यावर ज्येष्ठ पत्रकार तथा लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल यांनी लिहलेला हा अभ्यासपूर्ण लेख.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस, या निमित्त त्यानां मन:पूर्वक शुभेच्छा…!
श्री.खडसे तीन दशकापेक्षा जास्त काळ जिल्हा व राज्याच्या राजकीय क्षितिजावर कार्यरत राहिले आहे.भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे जिल्ह्यासह खान्देशात रुजविण्यात नि:संशय त्यांचाच वाटा सर्वाधिक आहे. नेता, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी वठविलेल्या भूमिका राज्याच्या राजकारणात निर्णायकी व नाविन्यपूर्ण तसेच कौतुकास्पद म्हणता येतील. त्यांच्या संदर्भात अनेक विषयांवर लिहिता येईल, पण १९९५ मधील तत्कालीन शिवसेना भाजप युतीच्या शासन काळातील तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून अल्प काळात त्यांनी केलेली कामगिरी काही बाबतीत मैलाचा दगड ठरली आहे. या खात्याचे ते फक्त तीन-चार महिनेच मंत्री होते. त्यांना हे खाते शिक्षणतज्ज्ञ म्हणून मिळाले नव्हते, तरी त्यांनी असे काही नाविन्यपूर्ण काम केले, जे तज्ज्ञांही जमले नसते.
जळगाव मध्ये कार्यरत असलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आज उभ्या असलेल्या आयटीआय या त्यांच्या धाडसी निर्णयांचा परिपाक आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता न देण्याचा निर्णय सन १९८४ मध्ये तत्कालीन शासनाने घेतलेला होता. मात्र असे असतांनाही त्यांनी त्यातुन मार्ग काढत प्रत्येक विद्यापीठ क्षेत्रांतर्गत एक अभियांत्रिकी महाविद्यालय असावे, असा धोरणात्मक निर्णय घेतला, त्याचा फायदा राज्यातील विद्यापीठांना झाला. आज याचे दृश्य परिणाम आपल्याला दिसून येत आहेत.
केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया पद्धत सुरू केली…..
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात मेरिट वर प्रवेश मिळावा, ही पद्धत राज्यात अंमलात आणणारे ते पहिले उच्च शिक्षण मंत्री म्हणता येतील. परिणामी होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे झाले..
व्हिजेटीआयचे वीरमाता जिजामाता नामकरण…
उच्च शिक्षण मंत्री असताना एकनाथराव खडसे हे मुंबई मधील व्हीजेटीआय या ख्यातनाम महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी या महाविद्यालयाचे इंग्रजी ( व्हिक्टोरिया जुबली इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजी ) हे नाव कसे असा प्रश्न करून विद्यार्थ्यांना विचारले हे नाव बदलायला हवे. तेव्हा तेथील अध्यापक म्हणाले साहेब या नावाला मोठी क्रेज आहे, ते ब्रँड नेम बनले असल्याने बदलू नये. पण याच कार्यक्रमात एक विद्यार्थिनी म्हणाली सर इंग्रजी शॉर्ट फॉर्मचे नाव तेच ठेवा. पणल वीर माता जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट असे नामकरण करता येईल. ही कल्पना खडसेंना आवडली आणि व्हिजीटीआयचे नामांतर झाले.
काश्मीरच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय
काश्मीर मधून पलायन केलेल्या पंडितांच्या मुला, मुलींना विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळत नव्हता, ते मिळवून देण्याचे काम एकनाथराव खडसे यांनी महाराष्ट्रात केले. नंतर देश भरतील इतर राज्यांनी त्याची अमलबाजवणी केली. तात्पर्य लोकांच्या समस्यांची जाण असणे महत्वाचे आहे, त्या साठी तद्न्य असणे गरजेचे नाही. उपेक्षित समाजाच्या काय गरजा, समस्या आहेत, त्या ओळखण्याची दृष्टि गरजेची आहे. समाजा प्रति असलेली कर्तव्य दृष्टी आणि जाणिवा महत्वाच्या आहेत. आणि लोकाभिमुख लोकप्रतिधीची हीच खरी ओळख आणि आजच्या काळात गरज आहे.
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं,
मेरी ये कोशीश है की ये सुरत बदलनी चाहीये…
एकनाथराव खडसे यांनी याच प्रकारे काम केले असून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी अमिट मुद्रा उमटवली असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
सुरेश उज्जैनवाल
88888 89014
( ज्येष्ठ पत्रकार तथा सल्लागार संपादक- लाईव्ह ट्रेंडस न्यूज )