दाम्पत्याचा मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न; दोन ठार एक गंभीर जखमी

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील दाम्पत्याने आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह रेल्वे खाली आत्महत्येचा प्रयत्न केला. यात आई व मुलगी जागीच ठार झाली असून पुरूष गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साकेगाव येथील रहिवासी हरीश शिरीष चौधरी (वय अंदाजे ३७) यांनी आपली पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीसह रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्यांची पत्नी आणि मुलगी जागीच ठार झाले. तर हरीश चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. परिसरातून जाणार्‍या लोकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी तातडीने गावातील लोकांना याबाबतची माहिती दिली. लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत असणार्‍या हरीश चौधरी यांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह हे शवविच्छेदनासाठी नेण्याची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, हा आत्महत्येचाच प्रकार असून या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल कशासाठी उचलले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Protected Content