शेतकर्‍यांचे एकमेव उध्दारकर्ते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती. यानिमित्त बाबासाहेबांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी केलेली महान कामगिरीचा आढावा सादर केलाय लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे सल्लागार संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी.

“उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे..” असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांविषयी एक सुप्रसिद्ध अन् लौकिकार्थ गीत आहे. यात विविध जाती, जमातीच्या शेतकरी कुळांचाही समावेश आहे. आज बाबासाहेबांची 130 वी जयंती यानिमित्त त्यांना विनम्रतापूर्वक अभिवादन!

त्यांची 130 वी जयंती साजरी करीत असताना दिल्लीच्या सीमेवर आपल्या न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या देशातील शेतकऱ्यांना निश्चितपणे बाबासाहेबांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी केलेल्या आंदोलनाची स्मृती जागी झाल्याशिवाय राहणार नाही.

शेतकऱ्यांचा जगातील एकमेव प्रदीर्घ संप

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांचे व्यक्तिमत्त्व व कार्याची जगात तोड नाही. बहुआयामी असे हे व्यक्तिमत्त्व भारताला लाभले, हे या देशाचे भाग्यच. राष्ट्राच्या घटनेचे शिल्पकार, शोषित, वंचित, बहुजनांचे भाग्यविधाता, असे विविध पैलू माहीत आहेतच, पण त्याचबरोबर ते देशातील पहिले शेतकरी नेते, उद्धारकर्ते होते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या 70 वर्षांत अनेक तथाकथित शेतकरी नेते झाले, मात्र, त्यांनी जो शेतकऱ्यांच्या वेदनांचा शाश्वत व मूलभूत मुद्दा मांडला व तडीस नेला तसा प्रयत्न आजतागायत कुणीही केला नाही. कोकणातील शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ‘खोती’ पध्दतीविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1930 मध्ये एक व्यापक जनचळवळ उभारली. या आंदोलनाचा परमोच्च बिंदू म्हणजे चरी (कोकण) गावाच्या परिसरातील चौदा गावांनी तब्बल सात वर्षे खोती सावकाराच्या विरोधात प्रदीर्घ संप केला, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झालेला हा संप आतापर्यंतचा जगातील पहिलाच ठरला आहे.

पेशवाईची जुलमी खोती पद्धत

कोकणातील बहुतांश जमीन डोंगराळ असून, शेतकऱ्यांनी ती सपाट करून तसेच समुद्र खाडीकिनारी अत्यंत कष्टाने बंधारे बांधून शेतजमीन लागवडीयोग्य केली. इतिहासातील नोंदीनुसार आदिलशाहच्या काळापासून या भागातील जमीन महसूल गोळा करण्यासाठी खोतांची नेमणूक केली होती. खोतांनी ठराविक महसूल जमा करून राजाकडे सुपूर्द करून त्यातील काही भाग स्वतःसाठी ठेवायचा, अशी त्या काळात रचना होती. तथापि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खोतांवर बंधने घालण्यात आली तसेच त्यांनी वतने द्यावयाची पध्दत देखील बंद करण्यात आली होती. परंतु नंतरच्या कालखंडात विशेषतः पेशवाईच्या काळात खोतांनी पुन्हा आपले उद्योग सुरू केले. महसूल जमा करण्यात मनमानी होऊ लागली. बहुतेक गावांत खोत हे सावकार म्हणूनच कार्यरत होते. अशिक्षित शेतकऱ्यांना कर्ज देऊन दामदुपटीने वसुली होऊ लागली. हळूहळू बहुतांश शेती खोतांच्या मालकीची झाली आणि मूळचे शेतकरी कूळ बनले.

खोतांनी सुलतानाप्रमाणे मनमानी सुरू केली. खोतांनी विविध मार्गाने बळकावलेल्या जमिनी कूळ कसू लागले. येणाऱ्या उत्पन्नातील बहुतांश वाटा खोत सावकाराला व अत्यल्प वाटा कुळांना मिळत असे. खोतांनी वेठबिगारी पध्दतही सुरू केली, वेठबिगारीस नकार देणाऱ्यास चाबकाने मारले जायचे, प्रसंगी मृत्युमुखी पडण्याच्याही घटना घडल्या. कुळांच्या घराजवळील फळे, कोंबड्या आदीही खोत उचलून नेत, एवढेच नव्हे, तर चांगले कपडे घालण्यासही बंदी होती. या गुलामगिरीमुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. खोती पद्धतीमुळे निर्माण झालेली विषमता व अन्यायाविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar व त्यांचे सहकारी नारायण नागू पाटील (रा. पेझारी), सुरबा नाना टिपणीस (महाड), भाई अनंत चित्रे यांनी व्यापक जनआंदोलन उभे केले.

कुळांचे वकील बाबासाहेब

खोतांच्या विविध प्रकारच्या जुलूमामुळे कोकणपट्टीतील वातावरण स्फोटक बनले होते. त्यातच दक्षिण कोकणातील तीन जमीनदार खोतांच्या हत्येचा प्रकार घडला व आरोप कुळावर ठेवण्यात आला, 23 व्यक्तींवर खटला भरण्यात आला. या खटल्यात कुळांची वकीलपत्रे बाबासाहेबांनी घेऊन त्यांची बाजू प्रभावीपणे मांडली.

शेती मालकी हक्काचे विधेयक

शेतकऱ्यांचा प्रदीर्घ संप सुरू असताना 16 डिसेंबर 1934 रोजी चरी (कोकण) येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांची सभा झाली. यावेळी बाबासाहेबानी भाषणात सांगितले, की “सद्य:स्थितीत मूठभर लोकांकडे शेतजमिनीची मालकी आहे. परंतु जे शेतात घाम गाळतात, कष्ट करतात त्यांच्याकडे जमीन नाही. या दोन्ही वर्गांत टोकाचा संघर्ष आहे. गेले काही वर्षे चरी व परिसरातील शेतकरी हे सावकार व जमीनदार यांच्याविरुद्ध संपावर गेले आहेत. अशाप्रकारचा वाद लवादामार्फत मिटविणे आवश्यक आहे. सरकारनेही यात लक्ष घालण्याची गरज आहे. कोकणातील खोती पध्दतीमुळे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे, याची मला जाणीव आहे. हा अन्याय यापुढे चालू द्यायचा नाही. या अमानवीय पद्धतीच्या अत्याचाराला सरकार जबाबदार असून, योग्य पद्धतीचा कायदा करणे हाच या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, म्हणून बाबासाहेबांनी खोती पद्धत नष्ट करण्याचे व कसणाऱ्याला जमिनीचे मालकी हक्क दिले जावेत, याबाबतचे विधेयक 17 सप्टेंबर 1937 रोजी मुंबई विधानसभेत मांडले. परंतु ते मंजूर झाले नाही. त्यामुळे सुमारे दहा हजार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा 10 जानेवारी 1938 रोजी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काढण्यात आला.

या मोर्चात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कुलाबा, ठाणे, सातारा , नाशिक या जिल्ह्यांतील शेतकरी प्रामुख्याने सहभागी झाले होते. कसेल त्याची शेतजमीन, खोती पद्धत नष्ट करा, शेतमजुरांना किमान वेतन यासह इतर मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या होत्या.

अन् प्रदीर्घ संप मिटला

या जनआंदोलनामुळे सरकार हलले. तत्कालीन महसूलमंत्री मोरारजी देसाई यांनी चरी या गावाला भेट दिली. तेथील नारायण नागू पाटील यांच्या विनंतीला मान देऊन संपात त्यांनी मध्यस्थी केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून त्यांनी लवादाचा निर्णय दिला. तब्बल सात वर्षे चाललेला संप मिटला. या लढ्याची खरी प्रेरणा, शेतकऱ्यांचे वास्तवरूपातील कैवारी बाबासाहेबच होते. ‘अन्यायाविरुद्ध पेटून उठा’ या संदेशाची खरोखर प्रचिती आली.

सुरेश उज्जैनवाल, जळगाव

Protected Content