कोरोनाच्या लढ्यात मुस्लिम समाजाने एकजुटीने उभे राहावे- ॲड.शहेबाज शेख

जळगाव, प्रतिनिधी । राज्यात कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी ही चिंतेची बाब असून, कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग जगातील संपुर्ण मानवजातीपुढे मोठे संकट व आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपली एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोना विरुध्द या लढयात मुस्लिम समाजाने एकजुटीने उभे राहावे असे आवाहन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतातील मुस्लिम समाजातील काही वर्ग हा कोरोनाला परतावून लावण्यासाठी आवश्यक असलेले सामाजिक अंतर व कोरोना महासाथीला रोखणाऱ्या उपायांचे कसोशीने पालन करत नसल्याचे संदेश तसेच,आरोग्य व पोलीस यंत्रणेवर हल्ले करीत असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियातून पसरत आहेत. दि.८ एप्रिल ला देशातील एका हिंदी वृत्त वाहिनीने प्रसारित केलेल्या वृत्तात मार्च मध्ये देशात कोरोना विषाणूमुळे जेवढे रुग्ण बाधित झाले, त्यातील 35 टक्के रुग्ण हे दिल्लीत झालेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यामुळे बाधित आहेत असे म्हटले असून,हे वृत्त संपूर्ण मुस्लिम समाजास चिंतीत करणारे आहे.

त्यामुळे या कठीण प्रसंगात या समाजातील प्रत्येक घटकाने, अत्यंत जबाबदारीने, काळजीपूर्वक आपल्या वर्तनातून कोरोना विषाणूच्या विरोधात पुकारलेल्या सामूहिक लढाईत देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या सोबत असल्याचा एक आदर्शपाठ आखून द्यावा. तसेच आपल्या प्रवासाची माहिती व इतिहास न लपविता तात्काळ आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेस स्वतःहुन संपर्क साधावा व आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे. अश्या वर्तनाने मुस्लिमांकडून कोरोना संसर्ग देशभर पसरला, या आरोपाला संधीही देऊ नये.

इस्लामी शरियानुसार आत्महत्या व स्वतःच्या बेजबाबदार पणामुळे निर्माण होणारे आजार हे इस्लाममध्ये हराम समजले जातात. कोरोना विषाणू हा एकाच व्यक्तीच्या शरीरात राहात नाही तर तो संक्रमित होऊन अन्य व्यक्तीला त्याची लागण होते आणि पर्यायाने अनेक कुटुंबे व समाजामध्ये तो फैलू शकतो, त्यातून निष्पापांच्या जीवावर बेतले जाऊ शकते.

प्रेषित मोहम्मद पैगंबर साहब यांच्या अनेक वचनात व हदीसमध्ये सुध्दा महासाथीतून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक पावले उचलण्यास सांगितली आहेत. सध्याच्या घडीला सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ जे सांगत आहेत, त्यांच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजचे आहे. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एक सुरक्षित उपाय म्हणून प्रत्येकाने विलगीकरण व लॉकडाऊन सूचनेचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून मशिदीत एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. एकदा कोराना साथीचे आव्हान परतावून लावल्यानंतर व जनजीवन सामान्य झाल्यानंतर मुस्लिम बांधव पुन्हा मस्जिद मध्ये नमाज पढु शकतात. आज आपण सर्वांनी सामाजिक अंतर ठेवण्यासाठी घरात नमाज पढणे गरजेचे आहे. आपले सर्वांचे जबाबदारीचे सामाजिक वर्तन केवळ ती व्यक्ती, त्याचे कुटुंबच नव्हे तर हा संपूर्ण देश वाचवण्यास मदत करणार आहे. त्यानेच या महासाथीला आपण परतावून लावू शकतो.

त्यामुळे या संकट समयी मुस्लिम समाजाने एकजुटीने पुढे येऊन, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना बळ दिले पाहिजे. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालय, केंद्र व राज्य सरकार यांच्या निर्देशांचे,आदेशांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.जेणेकरून या भयावह कोरोनाच्या विरोधात सरकार व समाजाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल.त्याचप्रमाणे आजच्या या भयावह परिस्थितीबाबत मुस्लिम समाजात जनजागृती करण्यासाठी शिक्षित वर्गाने पुढे यावे, असे आवाहन सुध्दा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे संपूर्ण मुस्लिम समजाला केले आहे.

Protected Content