संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !


पंढरपूर-दत्तात्रय गुरव । आषाढी वारी सोहळ्यानिमित्त आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना, सातारा जिल्हा प्रशासनाने पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

पालखीचे धर्मपुरी येथे उत्साहात स्वागत
सकाळी १० वाजता माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी बंगला येथे दाखल झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, माजी आमदार राम सातपुते, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी स्वागतापूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यातील नगारा आणि अश्वाचे पूजन करण्यात आले.

पालकमंत्र्यांनी खेळली फुगडी, हरिनामाचा गजर
पालखी स्वागतानंतर पालकमंत्री गोरे, प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्यासोबत काही अंतर पायी चालत गेले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया यांनी फुगडी खेळत ‘रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल’ नामाचा जयघोष केला. तसेच, पालकमंत्री आणि माजी आमदार राम सातपुते यांनीही फुगडी खेळत वारीच्या उत्साहात सहभाग घेतला.

सातारा प्रशासनाचा भावपूर्ण निरोप
तत्पूर्वी, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याआधी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यासणी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, फलटणचे उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप दिला.

वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून विविध सुविधा
‘जय हरी विठ्ठल… जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा… तुकाराम’ च्या नामघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस स्पष्ट दिसत होती. वारकऱ्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पालखी मार्गावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. हिरकणी कक्षातून महिला वारकरी आणि लहान मुलांसाठी सुविधा पुरवण्यात येत आहेत. पायी चालून वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी फूट मसाज मशीन सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

धर्मपुरी येथे पालखी आगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य शिक्षण, लेक लाडकी, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती, स्वच्छता या विषयांवर विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच, ग्रामविकास विभागाने वारकरी सेवा मसाज केंद्र, वैद्यकीय सेवा कक्ष, हिरकणी कक्ष, मुख्यमंत्री आरोग्य रथ, मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र, मोफत मोबाईल चार्जिंग पॉईंट, १०८ ॲम्ब्युलन्स सेवांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर, माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुते गावाकडे मार्गस्थ झाली. या ठिकाणीही दर्शनासाठी परिसरातील वारकरी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.