पांझरापोळ येथे श्रीमत् भागवत कथा ज्ञानयज्ञाला भक्तीमय वातावरणात सुरूवात !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हर घर सुंदरकांड समितीच्या वतीने आज सोमवारी दोन वाजेपासून पांझरापोळ गोशाळा येथे श्रीमत् भागवत महापुराण ज्ञानयज्ञ आणि कथेला सोमवारी ३० जून रोजी दुपारी २ वाजेपासुन सुरूवात करण्यात आली. परमपूज्य श्री नारायणजी ओझा यांच्या सुमधुर वाणीतून ही दिव्य कथा आता रसिक भक्तांना ऐकता येत आहे.

कथेच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजता भवानी मंदिर, सुभाष चौक येथून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शेकडो महिला भक्तगण पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर कलश घेऊन भक्तिपूर्ण उत्साहात सहभागी झाल्या होत्या. वाद्य-वादन आणि ‘जय श्री कृष्ण’ च्या जयघोषात निघालेल्या या यात्रेने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले. कलश यात्रेनंतर पांझरापोळ गोशाळा येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर लगेचच कथेचा प्रारंभ झाला. कथास्थळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आणि संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

सात दिवस चालणार कथा
या धार्मिक आयोजनाच्या यशस्वीतेसाठी दीपा तापडिया, राजेश बन्सल, प्रदीप जोशी, किरण शर्मा यांच्यासह हर घर सुंदरकांड समितीचे सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत. जळगाव शहरातील भाविकांनी या सातदिवसीय श्रीमत् भागवत महापुराण कथेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुण्यसंचय करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ही कथा पुढील सात दिवस चालणार असल्याने शहरात भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवता येणार आहे.