रावेर-यावलमध्ये खत तुटवड्यावर तोडगा; आमदार जावळेंच्या प्रयत्नांना यश


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील युरिया आणि डीएपी खताच्या तीव्र तुटवड्याची समस्या आता मार्गी लागली आहे. लिंकिंग प्रणालीमुळे खताविना त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, उद्या ‘बफर स्टॉक’मधून खताचा साठा अधिकृतपणे रावेर-यावल मतदारसंघासाठी रिलीज होणार आहे.

रावेरचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने जिल्हाधिकारी आणि राज्याचे कृषी मंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. नॉन-लिंकिंग युरिया व डीएपी खत तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

या निर्णयामुळे लिंकिंग नसलेल्या शेतकऱ्यांनाही आता युरिया व डीएपी खत सहज उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे खरीप हंगामाचे संभाव्य नुकसान टळण्यास मदत होईल. आमदारांनी शेतकऱ्यांच्या अडचणी वेळेवर शासनासमोर मांडून प्रभावीपणे हा प्रश्न सोडवल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट आहे. अनेकांनी आमदार अमोलभाऊ जावळेंच्या या तात्काळ कृतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.