कमरेला गावठी कट्टा लावून दहशत निर्माण करणाऱ्याला अटक !


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात नगरपालिकेच्या मागील बाजूस कमरेला गावठी कट्टा लावून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवार २६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आली. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा नगरपालिकेच्या पाठीमागील कब्रस्थानाजवळ एक इसम गावठी कट्टा लावून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीसांनी चोपडा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला ४० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव कार्तिक रवींद्र पवार (वय २१, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर) असे सांगितले. या प्रकरणी कार्तिक पवार विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत.

ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगावच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि चोपडा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, सफी जितेंद्र सोनवणे, सफी दीपक विसावे, पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकाँ ज्ञानेश्वर जवागे, पोहेकाँ हर्षल पाटील, पोना संदीप भोई, पोकॉ विनोद पाटील, पोकॉ निलेश वाघ, पोकॉ प्रकाश मधुरे आणि प्रमोद पवार यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.