जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधी आणि न्याय क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे दिवंगत ॲड. अच्युतराव अत्रे यांच्या स्मरणार्थ, यंदापासून ‘अग्रणी पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. अत्रे प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जाईल. या वर्षीचा हा पहिला पुरस्कार ठाणे येथील ॲड. व्ही.एन. आगासे यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे यांनी शुक्रवारी २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता शेठ ला.ना. शाळेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्काराचे स्वरूप आणि वितरण सोहळा
स्व. ॲड. अच्युतराव अत्रे यांच्या २९ जून या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी हा पुरस्कार दिला जाईल. विधी, न्याय आणि शिक्षण या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा ‘अग्रणी पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, पदक आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ॲड. आगासे यांनी विधी आणि न्याय क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल म्हणून त्यांना २०२५ वर्षाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा जळगाव शहरातील शेठ ला.ना. शाळेत रविवार, २९ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरकर यांच्या हस्ते ॲड. आगासे यांना हा ‘अग्रणी पुरस्कार’ प्रदान केला जाईल, असे ॲड. सुशील अत्रे यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे विधी आणि न्याय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.