पारोळा प्रतिनिधी | आगामी निवडणुकीच्या आधीच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत विकासाच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करण पवार होते.
नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतांना नगराध्यक्ष करण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन या प्रकारात पार पडली. यात विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या कामांमध्ये प्रामुख्याने विचखेडा बंधारा ते जॅकवेलपर्यंत जुन्या पाइपलाइनची दुरुस्ती, पालिका तळमजल्याचे नूतनीकरण, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेट बांधकामाला मुदतवाढ, धरणगाव माथा ते दिल्ली दरवाजा गेट रस्ता कॉँक्रिटीकरण, फूटपाथ, पथदिवे व गटारीच्या कामांना मुदतवाढ देणे, सावजी हॉटेलपासून होंडा शोरूमपर्यंत एचडीपीई ३ इंची पाइप लाइनला मंजुरी देणे आदींचा समावेश होता.
यासोबत कुटीर रुग्णालय ते शासकीय आयटीआय व सूत गिरणीपर्यंत सर्व भागात पाइपलाइन, राजीव गांधीनगरात पाइपलाइन आदी विषयांना मान्यता देण्यात आली. तसेच पालिका मोफत वाचण्यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रासाठी संगणक अज्ञावली सॉफ्टवेअर खरेदी करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली.