जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे १९ वा राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दिनांक ८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता रोटरी भवन, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगाव येथे संपन्न होणार आहे.
समाजात दलित-शोषित घटकांच्या विकासासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यासाठी प्रतिष्ठान दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करते. आजवर प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था सन्मानित झाल्या आहेत, त्यात मा. म. देशमुख (नागपूर), त्र्यंबक सपकाळे, प्रतापसिंग बोदडे, उत्तम कांबळे (नाशिक), भाऊ थुटे (वर्धा), आशु सक्सेना (नागपूर), संभाजी भगत (मुंबई), सरोज कांबळे (धुळे), आनंद तेलतुंबडे (मुंबई), शाहीर राजेंद्र कांबळे (सोलापूर) आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा (नावापुर) यांचा समावेश आहे.
या वर्षीचा सन २०२५ चा १९ वा राज्यस्तरीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार परिवर्तनवादी शाहिरी जलशाच्या माध्यमातून जनप्रबोधन करणारे आणि फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ सक्रियपणे राबवणारे भीम शाहीर आयु. किशोर वाघ यांना प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार सामाजिक प्रबोधन आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची धग जिवंत ठेवणारे आयु. संतोष इमलिबाई पीचा पावरा यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारांचे समाजात प्रबोधन करणाऱ्या आणि सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देणाऱ्या आयु. प्रतिभा शिंदे यांना काल. इंद्रायणी विश्वासराव भालेराव स्मृति “क्रांतीबा ज्योतिबा फुले” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध व्याख्याते मा. आयु. निरंजनजी टकले हे असतील, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य पी.आर. चौधरी (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर) उपस्थित राहणार आहेत.