विद्यापीठात संशोधन प्रकल्प लेखन राष्ट्रीय कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ज्ञान सामुग्रीच्या पुर्नरचनेत आपला वाटा असावा आणि संशोधनामुळे आपल्या ज्ञानात भर पडणार असेल व ते समाजपयोगी ठरत असेल तरच संशोधनाकडे वळावे असे स्पष्ट प्रतिपादन जेष्ठ संशोधक व अहिल्यादेवीनगर येथील प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील मराठी विभागाच्या वतीने बुधवार दि. ५ मार्च रोजी संशोधन प्रकल्प लेखन या विषयावर झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत बीजभाषण करतांना डॉ.शेलार बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे होते. कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.

डॉ.शेलार यांनी बीजभाषणात संशोधनाविषयी सविस्तर मांडणी केली. ते म्हणाले की, संशोधन ही मानवाची उपजत प्रवृत्ती आहे. असलेल्या संशोधनात काय उणीवा आहेत, त्या दुर करून काय करता येईल यांचा विचार करुन संशोधन केले तर पुढचे पाऊल पडेल. मात्र तसे होत नाही. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य आणि पुर्वापार चालत आलेले समज यामध्ये आपण अडकून पडत स्थितीवादी झालो आहोत. त्यामुळे ज्ञानसामुग्रीच्या या पुर्नरचनेत आपला वाटा असणे गरजेचे आहे. आपल्या भोवतीच्या प‍रिस्थितीतून संशोधनाचा विषय सुचत असतो असे सांगुन त्यांनी संशोधकाकडे कोणते गुण असायला हवेत हे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्रा.म.सु.पगारे यांनी संशोधन हे सत्यशोधनासाठी असते. संशोधनासाठी चिंतन आणि मननाची गरज असल्याचे सांगितले. डॉ.विनोद पाटील यांनी या कार्यशाळेमुळे नवीन संशोधकांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी समन्वयक डॉ.दीपक खरात यांनी प्रास्ताविक केले.यावेळी ४५ शोध निबंधाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दुपारच्या सत्रात संशोधन प्रकल्प लेखनाचे नियोजन यावर डॉ.भूपेंद्र केसुर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली यामध्ये प्रा.नितीन पाटील,डॉ.शशिकांत सोनवणे यांनी आपली भूमिका मांडली. तिसऱ्या सत्रात सहभागी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांचे निबंध वाचन झाले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन खेमराज पाटील यांनी केले. नेत्रा उपाध्ये यांनी आभार मानले.

Protected Content