जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डाच्या इयत्ता १२ वी आयएससीच्या निकालात आत्मन अशोक जैन याने घवघवीत यश संपादन केले आहे. ९७.७५ टक्के गुणांसह तो शाळेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून, विशेष म्हणजे विज्ञान शाखेतून तो शाळेत प्रथम आला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
आत्मनला गणित विषयात पैकीच्या पैकी १०० गुण मिळाले आहेत, तर इंग्रजीत ९८, केमिस्ट्रीत ९७, फिजिक्समध्ये ९६ आणि कॉम्प्युटरमध्ये ९६ गुण प्राप्त झाले आहेत. संपूर्ण भारतातून ९६,९४० विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती, त्यापैकी ९६,३४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ४५,५७९ विद्यार्थिनी आणि ५०,७६१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अनुभूती स्कूलमधून एकूण २९ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
अभ्यासात सातत्य हेच यशाचे गमक – आत्मन जैन
आपल्या यशाचे गमक सांगताना आत्मन अशोक जैन म्हणाला, “श्रद्धेय भवरलालजी जैन हे माझे दादाजी नेहमी कार्यमग्न असलेले मी पाहिले आहे. त्यांच्या संस्कारातूनच मी नियमित अभ्यासाला प्राधान्य दिले. परीक्षा जवळ आल्यावर खूप अभ्यास करण्याऐवजी वर्षभर अभ्यासात सातत्य ठेवले, यामुळेच हे यश मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली.”
गणित विषयात मिळालेल्या १०० पैकी १०० गुणांमागे आजोबा, वडील आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले, अशी प्रतिक्रिया आत्मन जैनने दिली. त्याच्या या यशाने जैन कुटुंबासह अनुभूती स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण आहे.