जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बळीरामपेठेतील आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवात भारताचा पहिला सुपर संगणक ‘परम ८०००’ ची भव्य प्रतिकृती साकारण्याचा संकल्प केला आहे. या अभिनव उपक्रमासाठी मंडळाच्या शिष्टमंडळाने ‘परम ८०००’ चे जनक, पद्मश्री डॉ. विजय भटकर यांची नुकतीच यशस्वी भेट घेतली. विशेष म्हणजे, डॉ. भटकर यांनी गणेशोत्सवादरम्यान जळगावात येऊन नागरिकांशी संवाद साधण्याच्या विनंतीला होकार दिल्याने जळगावकर उत्साहित झाले आहेत.
आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ हे जळगाव शहरातील एक नावलौकिक मंडळ आहे, जे दरवर्षी नाविन्यपूर्ण आरास साकारते. यापूर्वी त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिक पैलूंवर आधारित आरास साकारून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक होण्याची प्रेरणा दिली होती, तर भव्य INS विक्रांतची प्रतिकृती साकारून नौदलाचे यश सर्वांसमोर मांडले होते. तसेच, नदीजोड प्रकल्प साकारून जलक्रांतीचे स्वप्न जनतेला दाखवले होते.
यंदा मंडळ भारताच्या सुपर संगणक ‘परम ८०००’ ची प्रतिकृती सादर करून देशातील वैज्ञानिकांचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडणार आहे. डॉ. विजय भटकर यांनीच तयार केलेला हा संगणक भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक आहे. याच उद्देशाने काल, मंडळाचे सदस्य आश्विन भोळे, प्रा. कृणाल महाजन, चेतन पाटील, मयूर पाटील, रुपेश पाटील आदींनी पद्मश्री डॉ. विजय भटकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘परम ८०००’ संगणकाची सविस्तर माहिती आणि त्याच्या निर्मितीची यशोगाथा डॉ. भटकर यांच्याकडून जाणून घेतली.
प्रा. कृणाल महाजन यांच्या विनंतीला मान देऊन, डॉ. विजय भटकर यांनी प्रकृती ठीक असल्यास गणेशोत्सवात जळगावला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले आहे. मंडळाच्या सदस्यांनी ‘परम’ संगणकाची प्रतिकृती तयार करून शहरवासीय आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा निर्धार केला आहे. लवकरच मंडळ या कार्याचा श्रीगणेशा करेल.