जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ‘ट्रेण्ड नाऊ’ नावाच्या ॲप्लिकेशनद्वारे जळगावातील एका तरुणाची तब्बल १६ लाख ९८ हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही फसवणूक १२ नोव्हेंबर २०२४ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत घडली असून, या प्रकरणी गुरूवारी ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सायबर पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजमालती नगर येथील निखील कैलास गौड (वय २९) यांना नोव्हेंबर २०२४ मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी निखीलला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी, त्यांनी निखीलला ‘ट्रेण्ड नाऊ’ नावाचे एक मोबाईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले आणि त्यातून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला ५ ते १० हजार रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सांगितले. काही काळानंतर निखीलला नफा झाल्याचे भासवण्यात आले, ज्यामुळे त्याला अधिक पैसे गुंतवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. प्रत्यक्षात, निखीलच्या खात्यावर १८ लाख ६० हजार रुपयांचा नफा दाखवण्यात आला, परंतु हा केवळ आभास होता. प्रत्यक्षात, निखीलची एकूण १६ लाख ९८ हजार सहा रुपयांची फसवणूक झाली होती.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निखील गौड यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार, सायबर पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.