सीबीआय-दिल्ली पोलीस बतावणी; ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून लाखोंची फसवणूक !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंगसाठी वापरले जात असल्याची भीती दाखवून एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची ऑनलाईन माध्यमातून तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, यातील १० लाख रुपये पोलिसांनी रोखले असून, न्यायालयाच्या आदेशाने ती रक्कम संबंधित व्यक्तीला परत केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

सीबीआय-दिल्ली पोलीस बतावणी: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघड
प्रकाश बाबुलाल शिंपी (वय ७३, रा. फुले कॉलनी, चाळीसगाव) हे निवृत्त वैद्यकीय अधिकारी या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला दिल्ली पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून प्रकाश शिंपी यांना ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवली. तुमच्या खात्याचा मनी लाँड्रिंगसाठी वापर होत असल्याचे सांगून, त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने तीन वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ३१ लाख ५० हजार रुपये उकळले.

जळगाव सायबर पोलिसांची कारवाई, फसवणुकीची रक्कम रोखली
या गंभीर प्रकारानंतर प्रकाश शिंपी यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने तपास करत पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप चिंचोले यांच्या पथकाने संबंधित बँकांशी पत्रव्यवहार केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे फसवणुकीच्या रकमेपैकी १० लाख रुपये रोखण्यात (होल्ड) यश आले आहे. आता न्यायालयाच्या आदेशानंतर ही रक्कम शिंपी यांना परत केली जाईल.

डॉ. महेश्वर रेड्डींचे नागरिकांना आवाहन: फसव्या कॉल्सना बळी पडू नका
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कस्टम, सीबीआय, ईडी किंवा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणांच्या नावाने फोन आल्यास किंवा ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवल्यास त्याला बळी पडू नये. तसेच, कोणत्याही निमित्ताने पैशाची मागणी केल्यास आर्थिक व्यवहार करू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी सतर्क राहून अशा फसव्या कॉल्सपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.