भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेने शहरातील अतिक्रमणविरोधात मोठी मोहीम राबवत सकाळपासूनच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या फळ विक्रेत्यांच्या आणि इतर अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करत शहरातील रस्ते मोकळे करण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून काहींनी स्वयंस्फूर्तीने आपले अतिक्रमण हटवले आहे.
काल भुसावळ नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांतून गाडी फिरवून नागरिकांना सूचना करण्यात आल्या होत्या. ज्यांनी सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे, त्यांनी ते त्वरित हटवावे अन्यथा महापालिकेकडून ते जबरदस्तीने काढले जाईल, असा इशारा देण्यात आला होता. या सूचनेला अनुसरून आज सकाळपासूनच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, अग्निशामक दल आणि इतर संबंधित विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने कारवाईसाठी सज्ज झाले.
कारवाईची सुरुवात जैन मंदिर परिसर व डेली बाजार भागातून करण्यात आली. या ठिकाणी फळ विक्रेत्यांसह काही दुकानदारांनी फुटपाथ व रस्त्यांवर अतिक्रमण केले होते. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्त्यांची अडथळेमुक्तता आवश्यक असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, स्वच्छता समस्या आणि आपत्कालीन सेवेतील अडथळे निर्माण होत असल्याने पालिकेने ही कठोर भूमिका घेतली आहे.
या मोहिमेदरम्यान अनेक नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य केले असून, अतिक्रमण हटविण्यास स्वतःहून पुढाकार घेतला आहे. काही ठिकाणी किरकोळ वाद झाले असले, तरी संपूर्ण कारवाई शांततेत पार पडल्याची माहिती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांमध्ये या मोहिमेमुळे शिस्तबद्धपणाचा संदेश गेला असून, शहर स्वच्छ व सुरळीत होण्याच्या दिशेने ही सकारात्मक पावले मानली जात आहेत.
ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी अतिक्रमण न करता नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अतिक्रमणमुक्त शहरासाठी प्रशासन व नागरिक एकत्रितपणे कार्यरत होत असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.