भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाढत्या कचरा समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून शहराची स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. घंटागाड्या नियमितपणे न फिरणे, अनेक भागांत कचऱ्याचे ढिग साचणे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचा आरोप जय गणेश फाऊंडेशनने केला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर लोकवर्गणी जमा करून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेण्याचा इशारा संस्थेने भुसावळ नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.
जय गणेश फाऊंडेशनतर्फे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शहरातील कचरा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शहरातील कचरा उचलण्यासाठी असलेल्या घंटागाड्या नियमितपणे चालत नसल्याचे तसेच त्या चालविण्यासाठी लागणारे डिझेल खरेदी करण्याचीही आर्थिक क्षमता नगरपालिका प्रशासनाकडे नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. परिणामी अनेक भागांमध्ये जागोजागी कचऱ्याचे मोठे ढिग साचले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अनेक ठिकाणी दिवसेंदिवस कचरा न उचलल्यामुळे तो जाळण्याची वेळ येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कचरा जाळल्याने निर्माण होणारा धूर, दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि वस्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वच्छता पाहता प्रशासन सुस्त आणि निष्क्रिय असल्याचे स्पष्ट जाणवत असल्याची टीकाही संस्थेकडून करण्यात आली आहे.
जय गणेश फाऊंडेशनने यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संस्थेने स्मशानभूमी दत्तक घेऊन प्रत्येक रविवारी श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविल्याचा उल्लेख करत समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शहराच्या प्रश्नांसाठी नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून काम करण्याची तयारी असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
नगरपालिका प्रशासनाने येत्या दोन दिवसांत कचरा प्रश्न मार्गी लावण्यात अपयश आल्यास सोमवारपासून लोकवर्गणीतून निधी जमा करून श्रमदानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात येईल, असा इशारा जय गणेश फाऊंडेशनने दिला आहे. “प्रशासन सुस्त, पण नागरिक जागृत आहेत” तसेच “स्वच्छ भुसावळसाठी आता जनआंदोलन उभे राहील” अशा घोषणांमधून संस्थेने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.



