पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरासह तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला. शहरातील विविध ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतः भर पावसात रस्त्यावर उतरून नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत शहराची पाहणी केली.
शहरातील पाणी साचलेल्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करताना नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अडथळे दूर करण्याच्या तसेच पाण्याचा तातडीने निचरा करण्याच्या कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना पावसाच्या पाण्यामुळे कोणताही त्रास होऊ नये आणि संभाव्य आपत्ती टाळता यावी, यासाठी नगरपालिकेच्या यंत्रणेने तातडीने कामाला सुरुवात केली.

नगरपरिषद प्रशासन आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम करत पाणी साचलेल्या भागांमध्ये आवश्यक उपाययोजना राबवल्या. गटारी, नाले आणि पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्यासह पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले. मुसळधार पावसाची परिस्थिती असतानाही प्रशासनाने तातडीने प्रतिसाद दिल्याचे यावेळी दिसून आले.
या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपनगराध्यक्ष रोहन मोरे, माजी उपनगराध्यक्ष दिपकदादा अनुष्ठाण, नगरसेवक विवेकभाऊ पाटील, छोटूभाऊ पाटील, आरोग्य सभापती, गटनेते, सर्व नगरसेवक, बांधकाम स्थापत्य अधिकारी सुमित पाटील, आरोग्य निरीक्षक दिलीप चौधरी, मुकादम सिद्धार्थ इंगळे, सागर नरवाळे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून संभाव्य धोकादायक ठिकाणांवर विशेष नजर ठेवली जात आहे. नागरिकांना कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित प्रशासनाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे तसेच पावसाच्या पाण्याचा प्रवाह, नाले किंवा इतर धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.



