फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुसळधार पावसाच्या सरींनाही न जुमानता अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात गुरुवारी फैजपूर शहरात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. रावेर आणि यावल तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या नागरिकांच्या सहभागाने संविधान बचाव महासंघर्ष मोर्चाला मोठे स्वरूप प्राप्त झाले. आयोजकांच्या माहितीनुसार, या मोर्चात सुमारे पाच ते सहा हजार नागरिक सहभागी झाले असून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर ‘जय भीम’, ‘जय संविधान’ आणि ‘आंबेडकर, आंबेडकर’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही आंदोलनकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शिस्तबद्ध पद्धतीने विभागीय कार्यालयाच्या दिशेने मार्गक्रमण केले.

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, रावेर–यावल तालुका यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य समन्वयक अनोमदर्शी तायडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी भुसावळ येथील जगनभाऊ सोनवणे तसेच सामाजिक कार्यकर्ते शमीभा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना अनोमदर्शी तायडे यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर तीव्र भूमिका मांडली. ते म्हणाले की, हा केवळ आरक्षणाशी संबंधित प्रश्न नसून सामाजिक एकता, सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांशी निगडित गंभीर विषय आहे. हा संघर्ष कोणत्याही जातीविरोधात नसून अनुसूचित जातीतील सर्व घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनुसूचित जातीतील वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ प्रभावीपणे मिळावा, याबाबत कोणतीही हरकत नसल्याचे सांगताना त्यांनी त्यासाठी समाजामध्ये फूट पाडणे हा योग्य मार्ग नसल्याचे नमूद केले. शिक्षण, रोजगाराच्या संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि प्रभावी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मागास घटकांना सक्षम करण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे त्यांनी सांगितले.
तायडे यांनी पुढे संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या संरक्षणासाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. अनुसूचित जातींच्या एकतेवर परिणाम करणारा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शासनाने समाजातील सर्व घटकांशी संवाद साधावा आणि त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. विविध गावांमधून आलेल्या महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनात सहभाग घेतला. पावसाचा जोर असतानाही सहभागी नागरिकांनी घोषणाबाजी करत आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यामुळे फैजपूर शहरातील वातावरण आंदोलनमय झाले होते.
मोर्चा विभागीय कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.



