मोठी बातमी : प्रवाशी रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात दोन जणांचा समावेश; ५ रिक्षा जप्त!


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रवासी रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा जळगाव पोलिसांनी यशस्वी तपास करत एका अल्पवयीन मुलासह एका संशयित आरोपीला भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून नाशिक, चाळीसगाव आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या चोरीस गेलेल्या एकूण पाच प्रवासी रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी ४ जुलै रोजी दुपारी एक वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये प्रवासी रिक्षा चोरी झाल्याची घटना घडल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दामोदरे, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, विजय पाटील, किशोर पाटील, रवींद्र कापडणे आणि महेश सोमवंशी यांचा समावेश होता.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना, सादिक अली सय्यद अली (वय ४०, रा. पिंप्राळा हुडको. ह.मु. अक्सा नगर, वरणगाव) याने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने या रिक्षा चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले, तर सादिक अली सय्यद अली याला अटक केली.

चौकशीदरम्यान, आरोपींनी सुरुवातीला दोन प्रवासी रिक्षा चोरल्याचे कबूल केले. अधिक तपासात त्यांच्याकडे इतर तीन प्रवासी रिक्षाही असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, पोलिसांनी नाशिक आणि चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमधून चोरीस गेलेल्या २ आणि इतर ३ असे एकुण पाच प्रवासी रिक्षा जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे रिक्षा चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.