जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना जळगाव शहरातील नागरी सुविधांची दैना उडू नये आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापौरांनी आज आपल्या दालनात बांधकाम विभागाची तातडीची आढावा बैठक बोलावून पावसाळापूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट ताकीद दिली असून, पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करणे तसेच वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना घडू नये म्हणून धोकादायक झाडे व फांद्या तातडीने हटवण्याचे कडक आदेश दिले आहेत.
पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील धोकादायक झाडे आणि सुकलेल्या फांद्यांचा प्रश्नही बैठकीत चर्चिला गेला. रस्त्यांलगत असलेली धोकादायक झाडे, विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तसेच अपघातास कारणीभूत ठरू शकणाऱ्या झाडांची तातडीने छाटणी करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले. यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होईल, असे महापौरांनी सांगितले.

याशिवाय विविध प्रभागांतील नगरसेवकांनी रस्ते, गटारी आणि नागरी सुविधांबाबत सादर केलेल्या प्रस्तावांवर विलंब न लावता तातडीने अंदाजपत्रके तयार करण्याचे आदेश संबंधित अभियंत्यांना देण्यात आले. विकासकामांच्या प्रक्रियेत होणारा विलंब कमी करून प्रत्यक्ष कामांना गती देण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत नियोजित कामांचा आराखडाही सादर करण्यात आला. यावेळी शहर अभियंता योगेश बोरोले, विद्युत विभाग प्रमुख संदीप मोरे, बांधकाम विभागातील सर्व कनिष्ठ अभियंते, शाखा अभियंते आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते. शहराचा विकास आणि पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती व्यवस्थापन या दोन्ही आघाड्यांवर महापालिका प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून आले.



