‘अनुभूती’ शिबिराचा उत्साहात समारोप; विद्यार्थ्यांकडून उत्‍स्फूर्त सहभाग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे विकासार्थ विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जळगाव विभागाच्या वतीने आयोजित ‘अनुभूती’ या तीन दिवसीय उन्हाळी शिबिराचा उत्साही वातावरणात समारोप झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देणे, त्यांच्या सामाजिक जाणिवा वाढवणे आणि नेतृत्वगुण विकसित करणे या प्रमुख उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात जळगाव शहर आणि परिसरातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री. नंदनलाल गादिया, देवगिरी प्रदेश सहमंत्री वरुणराज नन्नवरे, विभाग संयोजक भाविन पाटील आणि शिबिरप्रमुख चेतन राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजकता विकासावर विशेष सत्र घेण्यात आले, तर विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार करत स्वच्छता मोहीम राबवली आणि शेततळ्याचेही निर्माण केले. सामाजिक विषयांवर प्रबोधनासाठी पथनाट्ये सादर करण्यात आली. याशिवाय, विद्यार्थ्यांमध्ये समुपदेशन, नेतृत्व आणि सहकार्याचे महत्त्व रुजवण्यासाठी विविध खेळ, ट्रेजर हंट आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी गीतगायन आणि अनुभव कथनातून आपली कला आणि भावना व्यक्त केल्या.

समारोप सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिबिरातील आनंददायी अनुभव आणि सामाजिक कार्याची प्रेरणा व्यक्त केली. समारोप प्रसंगी विभाग संघटन मंत्री धनंजय शेरकर, भुसावळ जिल्हा संयोजक मोहित देसाई आणि जळगाव जिल्हा संयोजक तेजस पाटील उपस्थित होते.