जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बालकलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने मलारा हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय विशेष नाट्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) च्या ‘थिएटर इन एज्युकेशन’ शाखेचे पदवीधर आणि सध्या बंगलोर येथे कार्यरत असलेले नाट्य प्रशिक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. अभिनय, खेळ, कला आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा संगम असलेल्या या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दि. १ मेपासून सुरू झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यावर विशेष भर देण्यात आला. पारंपारिक शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळा अनुभव देत ‘खेळातून शिक्षण’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम कार्यशाळेत घेण्यात आले. अभिनय कौशल्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, समूहभावना आणि अभिव्यक्ती क्षमता विकसित करण्यासाठी नाट्यपूर्ण खेळ आणि कृती सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना रंगभूमीचे प्राथमिक धडे देताना अभिनयातील बारकावे, शरीरभाषा, आवाजातील चढ-उतार, संवादफेक आणि प्रसंगानुरूप अभिव्यक्ती यांचे प्रशिक्षण दिले. विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाट्यकलेची गोडी निर्माण करण्यात आली. त्यामुळे मुलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यशाळेतील प्रत्येक उपक्रमाचा आनंद लुटला.
कार्यशाळेचे उद्घाटन चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नाट्यकलावंत हर्षल पाटील, मनोज पाटील तसेच आनंद मलारा उपस्थित होते. मलारा हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सर्जनशील वातावरणात कला शिकण्याची संधी मिळाली. शहरातील पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत मुलांच्या कलात्मक विकासासाठी अशा कार्यशाळांची गरज व्यक्त केली.
आज १० मे रोजी कार्यशाळेचा समारोप उत्साहात करण्यात आला. समारोपावेळी विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विविध अभिनय तंत्रांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. “नाट्यशास्त्र हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. खेळातून शिक्षण या पद्धतीमुळे मुलांमध्ये कलेप्रती आवड निर्माण होत असून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे,” असे मत प्रशिक्षक योगेश पाटील यांनी व्यक्त केले.



