पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील करंजी बुद्रुक गावासह परिसरात पावसामुळे ढग फुटीची परिस्थिती निर्माण झाली. यात नुकसानग्रस्त झालेल्यांना तातडीने मदत व्हावी. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुचित करून आमदार चिमणराव पाटील यांनी मदतीसंदर्भात चर्चा केली.
तालुक्यातील करंजी बुद्रुक गावासह परिसरात काल रात्री झालेल्या पावसामुळे ढग फुटीची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतातील पिके, शेती साधने यांचेसह नागरीकांच्या घरे जमिनदोस्त झाली. तसेच काही नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याने सर्व संसारोपयोगी साधने पाण्यात वाहून गेली. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसह अनेक कुटुंब रस्त्यावर आली. या सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत व्हावी. यासाठी गावातील सरपंच भैय्या पाटील, बाळू विश्राम पाटील, साहेबराव महादू पाटील यांचेसह नागरीकांनी आमदार चिमणराव पाटील यांचेकडे मागणी केली.
या मागणीची आमदार पाटील यांनी दखल घेत या नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुचित करून मदतीसंदर्भात चर्चा केली. याची मुख्यमंत्री यांनी त्वरीत दखल घेत थेट जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच या नुकसानग्रस्तांना लवकरच शासनातर्फे मदत जाहीर करण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्रींनी आमदार चिमणराव पाटील यांना दिले.